Pune Pedestrian Day : पुण्यात महापालिकेमार्फत यावर्षी देखील पादचारी दिवस साजरा केला जाणार आहे. उद्या बुधवारी ११ डिसेंबर रोजी पादचारी दिवस साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने पुण्यातील लक्ष्मी रस्ता सकाळी ८ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत वाहनांसाठी बंद ठेवला जाणार आहे. लक्ष्मी रस्त्यावर नागरिकांच्या करमणुकीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून हॅप्पी स्ट्रीटचे खेळ व रस्ता सुरक्षाबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत.
वाहतूक व्यवस्थेमध्ये सर्वांत दुर्लक्षित ठरलेल्या पादचाऱ्याला महत्त्व मिळवून देण्यासाठी पुणे महापालिका गेल्या चार वर्षांपासून ११ डिसेंबर रोजी पादचारी दिवस साजरा करते. लक्ष्मी रस्त्यावरील कुंटे चौक ते गरुड गणपती चौक या दिवशी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येतो. यावर्षी देखील हा रस्ता बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहतूक ही वळवण्यात आली आहे.
पादचारी दिनानिमित्त लक्ष्मी रस्ता हा आकर्षक पद्धतीने सजविण्यात येणार आहे. हा रस्ता वाहनविरहित करून पथ विभागातर्फे तो सजवलं जाणार आहे. या दिवशी जास्तीत जास्त नागरिकांनी लक्ष्मी रस्त्यावर यावे, यासाठी महा मेट्रोमार्फत कसबा आणि मंडई मेट्रो स्थानकापासून, पुणे मनपा मेट्रो स्थानकापासून खास सायकलीचे आयोजन करण्यात आले आहे. तर पीएमपीएलकडून जादा बससेवा पुरविण्यात येणार आहे.
पुणे शहर पोलिसांनी ११ डिसेंबर हा पादचारी दिन म्हणून साजरा करण्यासाठी लक्ष्मी रोडवरील वाहतूक वळवली आहे. पुणे शहर वाहतूक पोलिस विभागाने काढलेल्या अधिसूचनेनुसार लक्ष्मी रोडवर नगरकर तालीम चौक ते गरुड गणपती चौक या मार्गावर 'वाहनमुक्त रस्ता' जाहीर करण्यात आला आहे. सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत वाहतुकीतील बदल लागू राहणार आहेत. सेवा सदन चौक आणि उंबरया गणपती चौक ते गरुड गणपती चौक या ठिकाणी वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे. बेलगाव चौकातून टिळक चौकाकडे येणारी वाहने सेवा सदन चौक-बाजीराव रोडकडे वळविण्यात येणार आहेत. कुमठेकर रोडकडून लक्ष्मी रोडकडे जाणारी वाहने चितळे कॉर्नर-बाजीराव रोडकडे वळविण्यात येणार आहेत. लोखंडे तालीम चौकातून कुठे चौकाकडे जाणारी वाहने केळकर रोड-टिळक रोडकडे वळविण्यात येणार आहेत. नागरिकांनी व वाहनचालकांनी सहकार्य करून त्यानुसार प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
बस मार्ग क्रमांक ५५, ५८, ५९ हे बस मार्ग शनिपारकडे येताना कुमठेकर रस्ता मार्गे नियमित मार्गाने व शनिपारकडून जाताना अप्पा बळवंत चौक, नारायण पेठ, टिळक चौकातून पुढे नियमित मार्गाने संचलनात राहतील.
संबंधित बातम्या