मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Sharad Pawar: म्हणून पत्रा चाळ प्रकरणात शरद पवारांचं नाव घेतलं जातंय; NCP नं उघड केला भाजपचा डाव

Sharad Pawar: म्हणून पत्रा चाळ प्रकरणात शरद पवारांचं नाव घेतलं जातंय; NCP नं उघड केला भाजपचा डाव

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Sep 20, 2022 06:32 PM IST

Sharad Pawar in Patra Chawl Scam: पत्रा चाळीशी संबंधित कथित घोटाळ्याशी शरद पवार यांचा संबंध जोडणाऱ्या भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसनं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

Sharad Pawar
Sharad Pawar

Sharad Pawar in Patra Chawl Scam: गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या पत्रा चाळीशी संबंधित कथित घोटाळ्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव आलं आहे. ईडीच्या आरोपपत्रात माजी केंद्रीय कृषीमंत्र्यांचा उल्लेख आल्यानंतर भाजपचे एक आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी थेट पवारांचं नावच घेतलं आहे. त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपच्या या आरोपांना जशास तसं उत्तर दिलं आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्रातील बातमीचा आधार घेत आमदार भातखळकर यांनी आज ट्वीट केलं होतं. त्यात पत्राचाळीच्या घोटाळ्याचा उल्लेख आहे. पत्राचाळीच्या भ्रष्टाचाराचा आवाका पाहाता हे प्रकरण फक्त संजय राऊत यांना झेपणारं आहे असं सुरुवातीपासून वाटत नव्हतं. बड्या सत्ताधारी राजकारण्यांचा वरदहस्त असल्याशिवाय हा भ्रष्टाचार अशक्य होता. ईडीच्या आरोपपत्रात हे नाव आहे. One and only one शरद पवार,' असं भातखळकर यांनी त्यात म्हटलं होतं. या प्रकरणी तत्काळ चौकशी व्हावी, अशी मागणी भातखळकर यांनी केली होती. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी भातखळकरांच्या या आरोपांना उत्तर दिलं आहे. ‘भारतीय जनता पक्ष हा लबाडीचा सुपर स्प्रेडर आहे. पत्रा चाळ प्रकरणात जी चौकशी सुरू आहे, त्यातील आरोपपत्रात ईडीनं कुठंही शरद पवारसाहेबांचं नाव घेतलेलं नाही, परंतु खोटं बोल पण रेटून बोल ही भाजपची पद्धत आहे. त्यानुसार भाजप कंड्या पिकवत आहे,’ असा टोला तपासे यांनी हाणला आहे.

'राज्यात काल झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं आहे ते पचनी पडत नसल्यानं अतुल भातखळकर यांनी नवीन बातमी निर्माण केली आहे. मोठमोठ्या नेत्यांवर आरोप करायचे ही भाजपची जुनीच पद्धत राहिली आहे. त्यातून काहीच निष्पन्न होत नाही. परंतु नेत्याची व पक्षाची बदनामी करण्याचा हेतू असतो, असं तपासे म्हणाले. महागाई, बेरोजगारीकडं यांचं लक्ष नाही. शेतकरी आत्महत्या करतायत त्याकडं बघायला यांना वेळ नाही. केवळ सनसनाटी निर्माण करायची हाच यांचा उद्योग सुरू आहे. भातखळकरांनी केलेल्या ट्वीटला यापेक्षा जास्त अर्थ नाही, असं तपासे यांनी म्हटलं आहे.

IPL_Entry_Point

विभाग