मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पत्रा चाळ प्रकरण: ईडीच्या आरोपपत्रात नाव असलेले माजी मुख्यमंत्री कोण?; कुजबुज सुरू

पत्रा चाळ प्रकरण: ईडीच्या आरोपपत्रात नाव असलेले माजी मुख्यमंत्री कोण?; कुजबुज सुरू

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Sep 20, 2022 03:19 PM IST

Patra Chawl Case: पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत हे सध्या तुरुंगात आहेत. त्यांच्याविरोधातील आरोपपत्र ईडीने दाखल केले असून यात अनेक खुलासे करण्यात आले आहेत.

शिवसेना खासदार संजय राऊत
शिवसेना खासदार संजय राऊत (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

Patra Chawl Case: पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत यांना अटक केल्यानंतर ईडीने नुकतंच न्यायालयात आरोपपत्र सादर केलं. आता या आरोपपत्रात एका माजी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख असल्याचं समोर आलं आहे. संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा एकदा १४ दिवसांची वाढ केल्यानं ४ ऑक्टोबरपर्यंत त्यांचा तुरुंगातला मुक्काम वाढला आहे. दरम्यान, ईडीकडून आरोपपत्र आरोपीला देण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्यान न्यायालयाने नाराजीसुद्धा व्यक्त केली होती.

ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात काही बाबी समोर आल्या आहेत. माजी केंद्रीय मंत्री आणि माजी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे आता माजी मुख्यमंत्री कोण अशी कुजबूज सुरू झालीय. आरोपपत्रात असं म्हटलं आहे की, २००६-०७ या कालावधीत तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री आणि माजी मुख्यमंत्र्यंमध्ये बैठक झाली होती. तेव्हा बैठकीनंतर गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून राकेश वाधवान यांना पत्राचाळ विकास करण्यासाठी आणले गेले. त्यानंतर या प्रकरणात घोटाला झाला.

पत्राचाळ प्रकरणात जे काही घडत होते याबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांना माहिती होती असंही आरोपपत्रात म्हटलं आहे. पण माजी मुख्यमंत्री कोण होते त्यांच्या नावाचा उल्लेख मात्र आरोपपत्रात नाही. दुसरीकडे संजय राऊत हेच पत्राचाळ घोटाळ्यातील सूत्रधार असल्याचं ईडीने आरोपपत्रात म्हटल्यानं त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

ईडीने आरोपपत्रात म्हटले की, प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे विश्वासू होते. त्यामुळे त्यांना गुरु आशिष कंपनीत आणले. तसंच राऊतांचे ते जवळचे मित्र असल्याने प्रकल्पात होते. प्रवीण राऊत हे कोणत्याही महत्त्वाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करू शकत होते. म्हाडाशी चर्चा, सर्व सरकारी, निमशासकीय, वैधानिक आणि स्थानिक प्राधिकरणांशी संपर्क साधण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. संजय राऊत यांच्याशी जवळचे संबंध असल्यानं प्रवीण राऊत यांनी विविध फायदे मिळवण्यासाठी म्हाडाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर एफएसआयची बिल्डरला विक्री केली. प्रवीण राऊत यांचा गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीत २५ टक्के वाटा असला तरी ते फक्त एक चेहरा होते. बाकी सर्व संजय राऊत यांच्या हातात होतं असंही ईडीने म्हटलंय.

दरम्यान, पत्राचाळ प्रकरणात माजी केंद्रीय मंत्री आणि माजी मुख्यमंत्र्यां ईडीने आरोपपत्रात उल्लेख केल्याचं म्हटल्यानंतर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. पत्राचाळ भ्रष्टाचाराचा आवाका पाहता हे फक्त संजय राऊत यांना झेपणारे आहे असं वाटत नव्हते. बड्या सत्ताधारी राजकारण्यांचा वरदहस्त असल्याशिवाय हा भ्रष्टाचार अशक्य होता. ईडीच्या आरोपपत्रात नाव आहे. फक्त एकच शरद पवार. याप्रकरणाची तात्काळ चौकशी व्हावी अशी भातखळकर यांनी केली.

WhatsApp channel

संबंधित बातम्या