Pune rain news : पुण्यात रविवारी संध्याकाळी व रात्री झालेल्यामुसळधार पावसामुळे शहरात अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणीसाचले. राज्यातील महत्वाचे रेल्वे स्थानक असलेल्या पुणे रेल्वे स्थानकही पाण्यात बुडाले होते. या पावसामुळे स्थानकावर असलेल्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली. स्थानक परिसरात गुडघाभर पाणी साचल्याने प्रवाशांना या पाण्यातून सामानघेऊन पायपीट करावी लागली. स्थानकावर साचलेल्या पाण्यात अनेकांच्या बॅगा भिजल्या होत्या. या पावसामुळे रेल्वे स्थानकाच्या पाणी निचरा यंत्रणेची मात्र, पोलखोल झाली आहे.
पुणे रेल्वे स्थानकाला नुकतेच १०० वर्ष पूर्ण झाले. पुण्याच्या रेल्वे स्थानकाचा विकास केला जात आहे. अनेक कामे या ठिकाणी केले जात आहे. मात्र, रविवारी झालेल्या पावसामुळे या कामांची पोलखोल झाली. पुणे रेल्वे स्थानकाच्या दुरवस्थेचा फटका येथे येणाऱ्या प्रवाशांना बसत आहे. पुण्यात रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे स्थानकाच्या आवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. तब्बल गुडघाभर पाण्यातून प्रवासी हातातील बॅगा सांभाळत पाण्यातून वाट काढत होते. पुणे स्थानकातील साचलेल्या पाण्याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. स्थानकावरील अनेक प्लॅटफॉर्मवर देखील पाणी गळत होते. यामुले फलाट निसरडे झाले होते. काही प्लॅटफॉर्मवर तर काही प्रवासी गाडी पकडण्याच्या नादात पाय घसरून पडल्याच्या घटना देखील घडल्या.
पुणे स्थानकाच्या या दुरवस्थेबद्दल प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. प्रवाशांनी रेल्वे स्थानकातील साचलेल्या पाण्याची छायाचित्रे व व्हिडिओ सोशल मीडियावर टाकले. प्रवाशांना रेल्वे स्थानकात कक्ष पद्धतीने कसरत करावी लागत आहे हे या व्हिडिओतून दिसत आहेत. स्थानकाबाहेर रस्त्याची ऊंची वाढवल्याने हे पानी स्थानकात साचत असल्याचा दावा रेल्वे प्रशासाने केला आहे. दरम्यान, यावर उपाय योजना सुरू असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.
या बाबत विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य विकास देशपांडे म्हणाले, पुणे रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मवर पावसाचे पाणी गळत असल्याने ते निसरडे झाले. यामुळे ते प्रवाशांसाठी असुरक्षित बनले आहेत. लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांसाठी ते धोकादायक झाले आहेत. या स्थानकाची दुरूस्तीची मागणी करूनही रेल्वे प्रशासनाने मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले आहे.