Shivaji Park : सध्या लोकसभा निवडणुकचा धुरळा उडाला आहे. विविध पक्ष प्रचाराच्या तयारीला लागले आहे. मुंबईत आता सभा आणि प्रचार दौरे वाढणार असून जाहीर सभेसाठी शिवाजी पार्कचे मैदान मिळावे या साठी सर्वच राजकीय पक्षांनी मुंबई महानगर पालिकडे अर्ज केले आहेत. एप्रिल आणि मे महिन्यात सभांसाठी या मैदानाची मोठ्या प्रमाणात मागणी राजकीय पक्षांनी केली आहे. तर १७ मे रोजी उद्धव ठाकरे आणि मनसेच्या राज ठाकरेंच्या सभेसाठी देखील पालिकेकडे अर्ज आले आहेत.
लोकसभा निंवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू झाली आहे. प्रचार आणि जाहीर सभेसाठी शिवाजी पार्कची मोठी मागणी आहे. तर या सोबतच दादरमधील मोठ्या मैदानाची देखील राजकीय पक्षांनी मोठी मागणी केली आहे. जवळपास सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी एप्रिल आणि मे महिन्यात रॅलीसाठी शिवाजी पार्क मैदान बुक करण्यासाठी बीएमसीकडे अर्ज केले आहेत.
शिवसेना शिंदे गटाने दसरा मेळाव्यासाठीही शिवाजी पार्क मैदान मिळावे यासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे त्यामुळे यंदा उद्धव ठाकरेंना दसरा मेळावा घेणे अवघड होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अर्ज केलेल्या प्रत्येक पक्षाला परवानगी मिळेलच याची देखील शाश्वती नाही. शिवाजी पार्कवर सभेसाठी परवानगी देण्यासाठी नियम, अटी आणि दिवस या सगळ्यांचा विचार करून परवानगी दिली जाते. एकाच तारखेला जर दोन पक्षांनी अर्ज केले असतील तर ज्या पक्षाने पहिल्यांदा अर्ज केला आहे त्या पक्षाला परवानगी दिली जाते.
शिवसेना ठाकरे गट आणि राज ठाकरे यांच्या मनसेने देखील १७ मे रोजी सभेसाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे या साठी अर्ज केला आहे. २० मे रोजी शहरातील मतदानासाठी मतदानाचा प्रचार संपण्याच्या शेवटच्या दिवशी. लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना, शिवसेना (यूबीटी), भाजप, राष्ट्रवादी आणि मनसे या पाच पक्षांनी किमान १२ दिवसांचा अवधी मागितला आहे.
शिवसेनेला १६, १९ आणि २१ एप्रिल तसेच ३ , ५ आणि ७ मे रोजी मैदान हवे आहे. राष्ट्रवादीने २२, २४ आणि २७ एप्रिलला मैदान मिळवण्यासाठी अर्ज केला आहे. भाजपला २३ , २६ आणि २८ एप्रिलला मैदान हवे आहे. १७ मार्च रोजी भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपाच्या निमित्ताने शिवाजी पार्कवर नुकतीच मेगा रॅली काढणाऱ्या काँग्रेसने मैदानावर आणखी सभा घेण्यासाठी अद्याप अर्ज केलेला नाही. राष्ट्रावादी शरद पवार गटाने देखील या मैदानासाठी अर्ज केलेला नाही.
पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले की, बीएमसीला पक्षांकडून सहा अर्ज आले आहेत आणि काही अर्जांनी अनेक तारखांना मैदानाचे आरक्षण करण्याची विनंती केली आहे. या संदर्भात आम्ही राज्याच्या नगरविकास विभाग आणि निवडणूक आयोगाकडे विनंती पाठवली आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल,” असे पालिका अधिकाऱ्याने सांगितले.
खासदार संजय राऊत म्हणाले की, देशात लोकशाही आहे आणि सर्व पक्ष त्यांच्या सभा घेण्यासाठी मैदाने बुक करण्यास मोकळे आहेत. “कोणीही कुठेही रॅली काढू शकतात. आम्ही महाराष्ट्रात ४८ जागा लढवत आहोत...आणि आम्ही सर्वात आधी शिवाजी पार्कसाठी अर्ज केला. शिवाजी पार्कमध्ये राजकीय सभा घेण्याची परंपरा आहे. त्यामुळे जो कोणी अर्ज करेल, त्यांना परवानगी घ्यावी लागेल,” राऊत म्हणाले.