अवघ्या देशभरात आज अनंत चतुर्थीचा उत्साह असून वाद्यांच्या गजरात व लाईटच्या झगमगाटात राज्यात गणेश विसर्जन मिरवणुका सुरू आहेत. मात्र परभणीत गणेश विसर्जनाच्या उत्साहाला गालबोट लागले आहे. येथे विसर्जन मिरवणुकीत लावलेल्या डीजेमुळे एकाचा हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्याचबरोबर डॉल्बीच्या दणदणाटामुळे दोन जणांची दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परभणीच्या जिंतुर शहरात गणेश विसर्जन मिरवणूक सुरू असतानाच हा प्रकार घडला. दोघांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना जिंतुरहून परभणीला हलवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिंतूर येथे सार्वजनिक गणेश मंडळांची विसर्जन मिरवणूक सुरू होती. त्यावेळी शहरातील श्री राजा शिवछत्रपती गणेश मंडळाची मिरवणूक शिवाजी चौकात आली होती. मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीतील डीजेमुळे संदीप कदम यांना अस्वस्थ वाटू लागले व ते जमिनीवर कोसळले. यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर दोन जणांची प्रकृती गंभीर आहे.
शिवाजी कदम आणि शुभम कदम अशी या गंभीर व्यक्तीची नावे आहेत. या दोघांना तत्काळ जिंतुर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर बनल्याने येथे प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी परभणीला हलवण्यात आले. जिंतुर ग्रामीण रुग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणत गर्दी असून तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलीस पोलीस या घटनेनंतर सुरु असलेल्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
जिंतूरमधील या सर्व मिरवणुका छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सुरू होऊन शहरातील मुख्य बाजारपेठेतून शिवाजी चौकात येतात. येथे मिरवणुकांचा समारोप होत असून पुढे विसर्जनासाठी मार्गस्थ होतात.