Pune gangster parede in commissiore office : पुण्याचे नवनियुक्त पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारताच गुंडगिरीवर वचक बसवणार असल्याचे सांगितले होते. आता गुंडगिरीचा बीमोड करण्यासाठी नागपुरी पॅटर्न त्यांनी पुण्यात देखील राबवण्यास सुरुवात केली आहे. आज गजानन मारणे, नीलेश घायवळ, बाबा बोडके यांच्यासह तब्बल ३०० गुंडांची पोलिस आयुक्तालयात ओळख परेड काढून त्यांनी शहरात गुंडगिरी केल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल असा गर्भित इशारा देखील दिला.
अलीकडे अनेक गुन्हेगारांचे राजकारण्यांसोबतचे फोटो व्हायरल होत आहेत. विरोधकांनी हा मुद्दा उपस्थित केल्यावर पुणे पोलिसांनी तत्काळ प्रत्येक गुन्हेगार आणि गुंडांना आज थेट पुणे पोलिस आयुक्तालयात बोलावून त्यांना कडक इशारा दिला. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रत्येक टोळीला समज देत सक्त ताकीद दिली. यापुढे इन्स्टाग्रामवर रिल्स टाकली आणि गुन्हेगारीचे उदात्तीकरण केल्यास सोडणार नाही, असा गर्भित इशारा देखील त्यांनी दिला.
पुणे पोलिस आयुक्तालयाच्या आवारात तब्बल २०० ते ३०० गुंडांना एका रांगेत उभे करण्यात आले होते. यात कुख्यात गुंड निलेश घायावळ, गजा मारणे यासह अनेक टोळ्या होत्या. तर दुसऱ्या रांगेत गुन्हेगारी क्षेत्रात नव्याने आलेले काही तरुण उभे करण्यात आले होते. दरम्यान, भविष्यात कुठलाही गुन्हा करायचा नाही. कुठल्याही गुन्ह्यात प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष सहभागी व्हायचं नाही. इन्स्टाग्राम, व्हॉट्सअप यावर स्टेटस ठेऊन दादागिरी दाखवायची नाही, असे केल्यास गंभीर परिमाण होतील असा इशारा त्यांनी दिला.
डीसीपी क्राइम अमोल झेंडे म्हणाले, आज एकूण २६७ हिस्ट्री चिटर, आत्तल गुंड यांची ओळख परेड घेण्यात आली. यावेळी त्यांना मोबाईल नंबर आणि पत्ता बदलल्यास पोलिसांना कळवण्याचे कडक आदेश देण्यात आले. जर कोणी गुन्हेगार नोकरीच्या निमित्ताने दुसऱ्या शहरात स्थलांतरित झाला तर त्यांनी ताबडतोब पोलिसांना कळवावे.
डीसीपी म्हणाले, सीपीने ओळखीच्या टोळ्यांच्या नोंदी करण्याचे काम सोपवले. एकूण ३२ रेकॉर्ड पोलिसांकडे उपलब्ध आहेत, पोलिस रेकॉर्डमध्ये ५५० हून अधिक गुंडांच्या नोंदी आहेत. आज २६७ जणांना पोलिस आयुक्त कार्यालयात बोलावण्यात आले. रील पोस्ट करू नका, इन्स्टाग्राम, सोशल मीडियावर गुंडांचे उदात्तीकरण थांबवावे अशा अनेक सूचना यावेळी देण्यात आल्या.
पोलिस आयुक्त म्हणाले, आम्ही बोटांचे ठसे, पत्ते, गुन्हे नोंदी, मोबाईल क्रमांक आणि हँडसेट असे सर्व तपशील ठेवणार आहोत. कायद्याशी खेळू नका नाही तर आम्ही तुमच्याशी खेळू असा इशारा अमितेश कुमार यांनी दिला.