Panvel Rape News: राज्यात महिला आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवला जात असताना पनवेलतून धक्कादायक घटना उघडकीस आली. पनवेल येथील एका २४ वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी एकाच कुटुंबातील तीन जणांविरोधात गुन्हा दाखळ करण्यात आला, अशी माहिती पनवेल पोलिसांनी शुक्रवारी (२२ नोव्हेंबर २०२४) दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, पनवेलमधील वावंजे गावातील रहिवासी असलेल्या पुरुषाने पीडित महिलेला तिच्याशी लग्न करण्याचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले होते. आरोपीने ऑक्टोबर २०२३ ते मे २०२४ या कालावधीत पीडितावर अनेकवेळा वेगवेगळ्या ठिकाणी बलात्कार केला. त्यानंतर आरोपी आणि त्याच्या कुटुंबाने जातीचे कारण देत पीडितेला लग्नास नकार दिला आणि तिचा अपमान केला. यानंतर पीडिताने जवळच्या पोलीस ठाण्यात मुख्य आरोपी आणि त्याच्या नातेवाईकांविरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात २०२३-२०२४ या कालावधीत मुंबईत विनयभंगांची सर्वाधिक गुन्हे नोंदवण्यात आले. मुंबईनंतर पुणे, नागपुरात सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद करण्यात आली, यात बलात्कार, अपहरण, हुंडाबळी, विनायभंग यांसारख्याा गुन्ह्यांचा समावेश आहे. राज्यात गेल्या पाच वर्षात सर्वाधिक बलात्काराच्या घटना २०२३ मध्ये घडल्या. दरम्यान, २०१७ मध्ये राज्यात एकूण ४ हजार ३२० बलात्काराच्या घटना घडल्या. तर, २०१८ मध्ये ४ हजार ९७४ बलात्काराच्या घटना नोंदवण्यात आल्या. तर, २०१९- ५ हजार ४१२ घटना, २०२० मध्ये ४ हजार ८४६ घटना, २०२१- ५ हजार ९५४ घटना, २०२२ मध्ये ७ हजार ८४ आणि २०२३ मध्ये ७ हजार ५२१ घटना घडल्या आहेत.