Panvel Murder News: पनवेलमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली. संपत्तीसाठी एका महिलेने मानलेल्या भावाच्या मदतीने जन्मदात्या आईची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह तिघांना अटक केली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत असून या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
प्रिया प्रल्हाद नाईक (वय, ४४) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. मयत महिलेची एकुलती एक मुलगी प्रणाली घटस्फोटीत असून आपल्या पाच वर्षाच्या मुलीसह आई- वडिलांसह राहते. परंतु, प्रणालीचा आई- वडिलांच्या संपत्तीवर डोळा होता. त्यांची संपत्ती हडपण्यासाठी प्रणालीने तिच्या राखीभावासह आईच्या हत्येचा कट रचला, असे पोलीस तपासात निष्पन्न झाले. पनवेल शहर पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद केली. परंतु, शवविच्छेदनाच्या अहवालात महिलेचा मृत्यू गळा आवळून झाल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली.
प्राथमिक तपासात विवेक पाटील आणि विशाल पांडे या दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली. चौकशीदरम्यान अशी माहिती समोर आली की, पाटील हा प्रणालीचा मानलेला भाऊ आहे. पाटील याला पैशांची गरज आहे, हे प्रणालीला ठाऊक होते. यामुळे प्रणालीने आपल्या आईची हत्या करण्यासाठी पाटीलला १० लाख रुपये देण्याची तयारी दर्शवली. पाटील यानेही होकार दिला आणि एका मित्राच्या मदतीने प्रिया यांची गळा आवळून हत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रणाली ही मृत महिलेची एकुलती एक मुलगी आहे. दरम्यान, २०२० मध्ये प्रणालीचे घटस्फोट झाले असून आपल्या पाच वर्षाच्या मुलीसह आई- वडिलांच्या घरी राहते. परंतु, प्रणाली हिची वागणूक आई प्रिया यांना आवडत नव्हती. प्रणालीचे असे नाते संबंध होते, जे तिच्या आईला मान्य नव्हते. यामुळे त्यांच्या नेहमीच वाद व्हायचा. तर, नाईक कुटुंबाची रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक आहे. या गुंतवणुकीतून त्यांना भाड्यापोटी मोठी रक्कम मिळते. हे सर्व व्यवहार प्रिया या हाताळत होत्या. या मालमत्तेवर प्रणाली यांचा डोळा होता. हीच मालमत्ता मिळवण्यासाठी प्रणालीने आईच्या हत्येचा कट रचला.
दरम्यान, १३ सप्टेंबर रोजी प्रणली आपल्या मुलीसह घराबाहेर पडल्यानंतर पाटील आणि पांडे यांनी प्रिया यांच्या घराचा दरवाजा ठोठावला. प्रिया यांनी दरवाजा उघडला असता पाटील आणि पांडेने ओढणीने त्यांचा गळा आवळून हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना २३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.