नाशिकमध्ये आयोजित भाजपच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज एकाच कारने उपस्थित राहिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. यावर पंकजा मुंडे यांनी खुलासा केला आहे. आम्ही एकाच हॉटेलमध्ये थांबलो होतो, त्यांची गाडी पहिली आली त्यामुळे आम्ही सोबत बैठकीच्या ठिकाणी आलो, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
भाजपची प्रदेश कार्यकारिणी बैठक नाशिकमध्ये पार पडली. आज या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्री, राज्यातील कॅबिनेट मंत्री, पदाधिकारी हजर होते. या बैठकीसाठी आज पंकजा मुंडे आणि देवेद्र फडणवीस हे एकाच कारने कार्यक्रमस्थळी आले.
विधानपरिषद निवडणुकीत तिकीट डावलल्याने पंकजा मुंडे नाराज असल्याचं बोलले जात होते. त्या विशेष करून देवेंद्र फडणवीस यांच्या नाराज असल्याचे सांगितले जात होते. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बीडमध्ये सभा झाली होती. या कार्यक्रमाला पंकजा मुंडेंनी दांडी मारल्याने त्यांच्यातील नाराजीची जोरदार चर्चा सुरू होती. त्यातच आज (११ फेब्रुवारी) पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीसांनी एका कारमधून प्रवास केल्याने सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत.
यावर पंकजा मुंडे म्हणाल्या की, आम्ही एकाच हॉटेलमध्ये थांबलो होतो. माझी कार मागे होती आणि फडणवीसांची कार पुढे लागली होती. दोघांनी एकाच ठिकाणी जायचे होते, त्यामुळे आम्ही एकाच कारमधून प्रवास केला, असं स्पष्टीकरण पंकजा मुंडेंनी दिले आहे. पंकजा म्हणाल्या की, कोअर कमिटीत असल्याने भाजपाच्या बैठकीत उपस्थित होते. चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष झाल्यापासून पहिल्यांदाच कार्यकारणीची बैठक झाली होती. बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली. भाजपच्या कोअर कमिटी सदस्य म्हणून मी कार्यकारणी बैठकीला उपस्थित होते.
नाशिकमध्ये भाजपची राज्य कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक पार पडली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. दोन दिवसांच्या विचार मंथनानंतर भाजपकडून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी आपले लक्ष्य काय आहे, याची घोषणा केली आहे. राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिंदे गटाने मिशन २०० चा नारा दिला आहे. भाजप कार्यकारिणीने लोकसभेसाठी मिशन ४५ तर विधान सभेसाठी मिशन २०० चे लक्ष्य निश्चित केले आहे. यासोबतच शिंदे-फडणवीस सरकारने घेतलेले निर्णय जनतेपर्यत पोहोविण्याचे आवाहन कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना केले आहे.