Pankaja Munde: मला दारूवाली बाई म्हटलं गेलं, फडणवीस व्यथित होणार नाहीत; पंकजांचं वक्तव्य चर्चेत
Pankaja Munde Speech : भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली परळीत सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल वक्तव्य केलं आहे.
Pankaja Munde On Devendra Fadnavis : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचा उल्लेख 'फडतूस गृहमंत्री' असा केल्यामुळं शिवसेना (उद्धव बाळासाहे ठाकरे) आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील उडी घेत थेट उपमुख्यमंत्री फडणवीसांबद्दल वक्तव्य केलं आहे. विरोधकांनी माझा उल्लेख थेट दारूवाली बाई असा केला होता, त्यामुळं आता ठाकरेंच्या टीकेमुळं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यथित होणार नाहीत, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
ट्रेंडिंग न्यूज
परळी शहरात भाजपकडून सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली होती. त्यावेळी पंकजा मुंडे यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य केलं. परळीत माध्यमांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, राजकारण हा काटेरी रस्ता आहे. राजकारणातील सिंहासन देखील काटेरी असतं. सत्तेत असताना विरोधकांकडून आपल्यावर नेहमीच टीका होत असते. अनेकदा खालच्या पातळीवरही टीका केली जाते. मी मंत्री असताना मला दारूवाली बाई म्हटलं गेलं होतं. त्यामुळं आता उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेमुळं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यथित होणार नाहीत, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. त्यामुळं आता पंकजा मुंडेच्या वक्तव्यावरून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
मी सत्तेत असताना माझ्यावर अनेकदा खालच्या पातळीवर टीका करण्यात आली होती. दारूवाली बाई आणि घोटाळ्यांच्या आरोपांवरून मला लक्ष्य करण्यात आलं. ट्रोलिंग करत रेल्वेस्टेशनवर माझे फोटो लावण्यात आले होते. माझा फोटो लावून काही लोकांनी पाकिटं वाटली. त्यावेळी माझा अपमान करण्यात आला, त्यामुळं राजकारणात केवळ फुलंच नाही तर काटेही वाट्याला येतील. त्यामुळं उद्धव ठाकरेंच्या टीकेमुळं देवेंद्र फडणवीस व्यथित होतील, असं वाटत नाही. असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.