Pankaja Munde Dasara Melava : “...मैं गोपीनाथ मुंडे की बेटी हूँ.अशी शायरी करत पंकजा मुंडे यांनीबीडमधील दसरा मेळाव्याची सुरुवात केली. मी गरीबांसाठी काम करणारी आहे. राजकारणाला चिटकून बसणारी नाही. ५ लेकरांनी जीव दिला. त्या आमदारकीचं काय गोड वाटणार आहे, असे विधान मुंडे यांनी केले. त्यासोबतच त्यांनी मला फक्त एकाच गोष्टीची भीती वाटते, असे म्हणत एक मोठा खुलासा देखील केला.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, कितीही वर्ष लागो तुमचं जीवन सुसह्य केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. तुमच्या मुलांच्या अंगावरचा मळका शर्ट पाहून मला वेदना होतात. पंकजा मुंडे कुणाला घाबरत नाही. अंधारात भेटत नाहीमहाराष्ट्राच्या प्रत्येक गावा-गावात जावून मी दौरा करणार आहे. पंकजा मुंडे खोटे बोलते का? उजेडात एक आणि अंधारात एक असं वागते का? आणि कुणाला घाबरते का? कुणालाही घाबरत नाही. फक्त घाबरते जर या पुढच्या मैदानात माझे भाषण ऐकण्यासाठी लोक नसतील तेव्हा. मी भगवान बाबांना प्रार्थना करेन की असा दिवस येऊ देऊ नका.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, तुमच्यासाठी भांडायचं आहे. तुम्हाला विमा मिळावा, तुमच्या शेतीच्या भावाला चांगला दर मिळावा. तुमच्या गावापर्यंत रस्ते चांगले व्हावेत, शाळा आणि शिक्षण यासोबतच अनेक गोष्टी करायच्या आहेत. मंत्री असताना सर्व गोष्टी केल्या. न मागता रस्ते दिले. न मागता या जिल्ह्याला सर्व काही दिले. बीड जिल्ह्यातील प्रत्येकासाठी मी कामं केलं. निधीबाबत कधीच भेदभाव केला नाही.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, यावेळी गडबड झाली. आपल्याला ही गडबड दुरुस्त करायची आहे. छत्रपती घराण्याने गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम केलं. एकदा उदयनराजेंच्या प्रचाराला गेल्यानंतर त्यांनी मला त्यांच्या देवघरात नेऊन माझ्या हाताने आरती केली होती. त्यांच्या एका घरात त्यांच्या वडिलांचा आणि गोपीनाथ मुंडे यांचा फोटो आहे. आम्ही जात बघून काम करत नाही. आपल्याला काम करणाऱ्या माणसाच्या मागे उभं राहायचं आहे. जातीवर स्वार होणाऱ्यांच्या मागे उभं राहायचं आहे, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, या मेळाव्याला मंत्री धनंजय मुंडे म्हणजेच'माझा धनु भाऊ'. त्याबरोबर माझी बहिण देखील उपस्थित आहे. तसेच माझा मुलगा आर्यमन देखील भगवानबाबांच्या दर्शनाला आला आहे. माझा मुलगा आर्यमानपेक्षा ही जनता मला जास्त प्रिय आहे. पोटच्या लेकरापेक्षा मी तुमच्यावर माया करते. भगवान भक्ती गडावर दसरा मेळाव्यासाठी आलेल्या लक्ष्मण हाके यांचा पंकजा मुंडे यांनी गोंडस लेकरू असा उल्लेख केला आहे. माझ्या मेळाव्याचं मी कुणाला निमंत्रण देत नाही. माझा सन्मान ठेवून आलेल्या लक्ष्मण हाके यांचं मी स्वागत करते.