Pandharpur Temple Visit : आषाढी-कार्तिकी वारीसोबतच अन्य एकदशी तसेच सदासुदीला पंढरपुरात भाविकांची प्रचंड गर्दी असते. लग्न सराईतही पंढरपूर मंदिर भाविकांची गजबजून गेलेले असते. विवाह झाल्यानंतर नवविवाहित जोडपे देवदर्शन करून आपल्या संसाराची देवाच्या आशिर्वादाने सुरुवात करत असतात. पंढरपूरच्या विठ्ठल- रुक्मिणी मंदिरातही नवविवाहित जोडप्यांची गर्दी होत असते. देवदर्शनासाठी येणाऱ्या नवविवाहित जोडप्याला आता विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी रांगेत उभे राहण्याची आवश्यकता राहणार नाही. कारण विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या नवविवाहित जोडप्यांना व्हीआयपी दर्शन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने हा मोठा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरपुरात येत असतात. विवाहानंतर नवविवाहित जोडपे आपल्या सुखी संसाराची सुरुवात देवदर्शनाने करत असतात. यामध्ये पंढरपूरचे मंदिरही प्रसिद्ध आहे. आता पर्यंत या जोडप्याना देखील भाविकांच्या नियमित दर्शन रांगेत उभे राहून दर्शन घ्यावे लागत होते. मात्र आता त्यांना रांगेत तासनतास उभे राहण्याची गरज नाही, त्यांना थेट दर्शन देण्याचा निर्णय घेतला आहे.
विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या आज पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. नवविवाहित जोडप्यांसोबतच दिव्यांगांनाही थेट दर्शनाचा लाभ मिळणार आहे. याबरोबरच पंढरपुरातील स्थानिक नागरिकांसाठीही दर्शनासाठी वेगळी वेळ दिली आहे. स्थानिकांना सकाळी ६ ते ७ आणि रात्री १० ते साडे दहा वाजेपर्यंत दर्शनासाठी सोडले जाणार आहे. मंदिर समितीच्या या निर्णयामुळे गर्दी नियंत्रणासाठी मदत मिळणार आहे. याची अंमलबजावणी उद्यापासून (२९ जानेवारी) करण्यात येणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.
गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले की, ८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या माघ यात्रेसाठी मंदिर समितीची बैठक झाली. या बैठकीत आषाढी आणि कार्तिकी या महायात्राप्रमाणेच माघी वारीत सुद्धा भाविकांना तशाच सुविधा दिल्या जाणार आहेत. विठुरायाच्या दर्शनासाठी अंध अपंग दिव्यांग आणि चालता न येणारे अतिवृद्ध यांना झटपट दर्शन दिले जाणार आहे. यासाठी व्हील चेअरची व्यवस्था केली जाणार आहे. विठुरायाच्या दर्शन रांगेत मृत्यू झालेल्या भाविकांना एक लाख रुपयांची आर्थिक मदत व मृतदेह गावापर्यंत नेण्याचा खर्चही आता मंदिर समिती करणार आहे. माघ यात्रा काळात ऑनलाइन आणि व्हीआयपी दर्शन हे पूर्णपणे बंद राहणार आहे. असून भाविकांना जलद दर्शन होण्यासाठी सहा पत्रा शेड उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
संबंधित बातम्या