Pandharpur : पंढरी भाविकांनी गजबजली.. माघी यात्रेनिमित्त पाच लाख भाविक पंढरपुरात दाखल
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pandharpur : पंढरी भाविकांनी गजबजली.. माघी यात्रेनिमित्त पाच लाख भाविक पंढरपुरात दाखल

Pandharpur : पंढरी भाविकांनी गजबजली.. माघी यात्रेनिमित्त पाच लाख भाविक पंढरपुरात दाखल

Published Feb 01, 2023 08:12 PM IST

Maghi Yatra Vitthal Rukmini in Pandharpur : वर्षातील चार मोठ्या एकादशींपैकी एक असलेल्या माघी एकादशीनिमित्त पंढरपुरात आज पाच लाखांहून अधिक भाविक दाखल झाले आहेत.

 पंढरी भाविकांनी गजबजली
 पंढरी भाविकांनी गजबजली

Maghi Yatra  Pandharpur : आज जया माघी एकादशी सोहळ्याला राज्यभरातून ५ लाखाहून अधिक भाविक दाखल झाले आहेत. संपूर्ण राज्यातून शेकडो दिंड्या पंढरीत दाखल झाल्या असून पंढरीनगरी भाविकांनी गजबजली असल्याचे चित्र दिसून येते. टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषाने अवघी पंढरी दुमदुमून गेली.

दरम्यान,  आज बुधवारी  पहाटेएकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्य शकुंतला नडगिरे यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची तर सदस्य दिनेशकुमार कदम यांच्या हस्ते रुक्मिणीची महापूजा पार पडली. 

माघी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध पानाफुलांची आकर्षक , मनमोहक सजावट करण्यात आली होती. 

माघी यात्रेला आलेले भाविक चंद्रभागा स्नान करण्यासाठी गर्दी करत आहेत. चंद्र भागा वाळवंट भाविकांनी फुलले आहे. तर स्नान झाल्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी चे दर्शन घेण्यासाठी मंदिराकडे गर्दी करत आहेत. मुख दर्शन, कळस दर्शन घेण्यासाठी भाविक मंदिराकडे येत आहे तर पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी आतुर झालेल्या भाविकांना दर्शन रांगेत उभारावे लागत आहे. दर्शन रांग पत्राशेड मधील ६ दर्शन शेड भरून पुढे रांग गोपाळपूर रस्त्यावर दर्शन रांग गेली होती. एक लाख भाविक दर्शन रांगेत उभे आहेत तर ६५ एकर जागेत येथे २ लाखाहून अधिक भाविक तंबू, राहुट्या उभारून वास्तव्य करत आहेत. तर मठ, मंदिर, धर्मशाळा, शिक्षण संस्था आदी ठिकाणी भाविक भजन, कीर्तन व प्रवचनात दंग असल्याने पंढरीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

चंद्रभागा नदीपात्रात स्नान करताना भाविकांबाबत कोणतीही अप्रिय घटना घडू नये म्हणून आपती व्यवस्थापन विभागाकडून चार स्पीड बोटी (जीवरक्षक) तैनात करण्यात आलेल्या आहेत. तर यात्रेत चोर्‍या मार्‍या होऊ नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त तैनात असून १२५ सीसीटिव्ही कॅमेर्‍यांची देखील करडी नजर असणार आहे. १५५० पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात आहेत. तर भाविकांच्या वेशात पोलीस कर्मचारी सेवा बजावणार असल्याने यात्रेत होणार्‍या चोर्‍यांवर आळा बसण्यास मदत होणार आहे.

दर्शन रांगेतील भाविकांना मंदिर समितीकडून शुध्द पाणी, चहा, नाश्ता पुरवला जात आहे. तर दर्शनासाठी ८ ते १० तासाचा कालावधी लागत आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर