मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  kartiki Ekadashi : पंढरपुरातील मराठा समाजाच्या 'या' ५ मागण्या मान्य, कार्तिकी एकादशीला शासकीय महापूजेचा मार्ग मोकळा

kartiki Ekadashi : पंढरपुरातील मराठा समाजाच्या 'या' ५ मागण्या मान्य, कार्तिकी एकादशीला शासकीय महापूजेचा मार्ग मोकळा

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Nov 21, 2023 08:16 PM IST

Pandharpur Kartiki Ekadashi 2023 : पंढरपुरातील मराठा समाजाच्या पाच मागण्या प्रशासनाने मान्य केल्याने उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Pandharpur kartiki Ekadashi 2023
Pandharpur kartiki Ekadashi 2023

राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा वाद पेटला असून पंढरपुरातील मराठा समाजाने आक्रमक भूमिका घेत कार्तिकी एकादशीच्या महापूजेला उपमुख्यमंत्र्यांना पंढरपुरात येऊ देणार नसल्याची भूमिका घेतली होती. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला आवाहन केलं होतं की, कार्तिकी एकादशीला शासकीय पूजेचा मान उपमुख्यमंत्र्यांचा असून या परंपरेला विरोध करू नका. पूजेला विरोध करण्याची किंवा त्यात अडथळा निर्माण करण्याची महाराष्ट्राची संस्कृती नाही. यानंतर आपल्या पाच मागण्या समोर ठेऊन मराठा समाजाने आपले आंदोलन मागे घेतले आहे. यामुळे कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापुजेचा मार्ग मोकळा झाला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मराठा आरक्षणावरून आक्रमक झालेल्या मराठा समाजाने कार्तिकी एकादशीला पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिरात उपमुख्यमंत्र्यांना शासकीय पूजा न करू देण्याचा इशारा दिला होता. आता  प्रशासनाशी झालेल्या चर्चेनंतर मराठा समाजाने आंदोलन मागे घेतले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची महापुजा होणार आहे. आंदोलनकांनी प्रशासनासमोर पाच मागण्या केल्या होत्या. त्या मागण्यांवर सकारात्मक उत्तर सरकारकडून आल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांना पूजा न करू देण्याचे आंदोलन मागे घेण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. 

मराठा समाजाने आंदोलन मागे घेतल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय पूजा पार पडणार आहे. त्यादिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठा आंदोलकांच्या शिष्टमंडळासोबत ३० मिनिटे चर्चा करणार आहेत. 

मराठा आंदोलकांच्या पाच मागण्या -

सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांची मराठा आंदोलकांच्या शिष्टमंडळासोबत बैठक पार पडली. या बैठकीत शिष्टमंडळाने पाच मागण्या समोर ठेवल्या. या मागण्यांबाबत विचार करण्यासाठी आणि सरकारसोबत चर्चा करण्यासाठी प्रशासनाने थोडा वेळ मागून घेतला. त्यानंतर काही वेळाने पुन्हा एकदा मराठा आरक्षण आंदोलकांसोबत बैठक पार पडली. त्यात प्रशासनाने मागण्या मान्य असल्याचे सांगितले. त्यानंतर मराठा आंदोलन मागे घेण्यात आले.

पंढरपुरातील मराठा समाजाने केलेल्या पाच मागण्या 

  •  पंढरपूर शहर व तालुक्यात अनेक ठिकाणी जुन्या दप्तरातील जन्म आणि जात नोंदणी सापडून येत नाहीत. सदर जुनी दप्तर उपलब्ध करून मोडी व उर्दू लिपीच्या माहितगारांची शासनाने नियुक्त करावी. 
  • पंढरपूर शहरामध्ये शासकीय अथवा नगरपालिकेच्या जागेत मराठा भवन इमारतीची उभारणी करावी.
  • पंढरपूर येथे मराठा मुले व मुलींसाठी स्वतंत्र वस्तीगृह उभारण्यात यावे.
  • सारथी संस्थेचे पंढरपूर येथे उपकेंद्र उभारण्यात यावे.
  • मनोज जरांगे पाटील यांना दिलेल्या २४ डिसेंबर २०२३ या मुदतीत मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे.

WhatsApp channel