Pandharpur ashadhi Ekadashi Yatra : आषाढी यात्रेसाठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी एसटी महामंडळाने आनंदाची बातमी दिली आहे. विविध आगारांतून पंढरपूरला यात्राकाळात ५ हजार विशेष बस सोडण्याचे नियोजन महामंडळाने केले आहे. विशेष म्हणजे राज्यातील कोणत्याही गावातून ४० अथवा त्या पेक्षा अधिक भाविकांनी ग्रुप बुकिंग केल्यास त्यांना गावातून थेट पंढरपूरला बससेवा पुरवण्यात येणार आहे. स्पेशल एसटी बुकिंग करण्यासाठी भाविक प्रवाशांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधण्याचे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे.
दरवर्षी आषाढी वारीला (AshadhiEkadashi) राज्यभरातून लाखो वारकरी विठु नामाचा जागर करत पंढरपुरला विठुरायाच्या दर्शनाला येतात. अनेक प्रवासी स्वत:च्या खाजगी वाहनाने, रेल्वेने, एसटीने अथवा विविध पालखी सोहळ्याबरोबर पायी चालत दिंडीने पंढरपुरात दाखल होत असतात. एमसटी महामंडळाकडूनही दरवर्षी अतिरिक्त बसफेऱ्या सोडल्या जातात. यंदा गावातून थेट पंढरपूर अशी बस सेवा उपलब्ध करून दिल्याने भाविकांची मोठी सोय झाली आहे. ग्रुप बुकिंगसाठी ४० किंवा त्याहून अधिक प्रवासी असल्यास गावातून बससेवा पुरवली जाणार आहे. जादा बस फेऱ्यांमध्येही ७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास देणारी ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’, महिलांसाठी ५० टक्के तिकीट दरात सुट देणारी ‘महिला सन्मान योजना’ आदि राज्य सरकारच्या सवलत योजना लागू राहतील, असे महामंडळाने स्पष्ट केले आहे.
आषाढी यात्रेला(pandharpur ashadhi ekadashi ) जाणाऱ्या फुकट्या प्रवाशांची संख्याही अधिक असते. यात्रा काळात गर्दीचा फायदा घेऊन तिकीट न काढणे, वाहकांकडून तिकीट मागून न घेता फुकट प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक असते. याला लगाम घालण्यासाठी एसटीने पंढरपूरला जाणाऱ्या विविध मार्गावर १२ ठिकाणी तपासणी नाके उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी एसटीच्या २०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे.
आषाढी यात्रेसाठी पंढरपूरला राज्यभरातून तसेच परराज्यातील लाखो भाविक येत असतात. प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन एसटीकडून अतिरिक्त बसफेऱ्या सोडण्यात येणार आहेत. तसेत प्रत्येक विभागांतून या गाड्या सोडल्या जातील. एकाच स्थानकावर वारकरी, भाविक तसेच पर्यटकांची होणारी गर्दी पाहता प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा,भिमा,पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत.
दरम्यान, यात्रा काळात बसस्थानकावर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक आदि विविध सोयी-सुविधा पुरविण्यात येणार आहेत.
संबंधित बातम्या