मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ashadhi Wari 2022 : पंढरपूर वारकऱ्यांसाठी खुशखबर, मुख्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा

Ashadhi Wari 2022 : पंढरपूर वारकऱ्यांसाठी खुशखबर, मुख्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Jul 06, 2022 06:48 PM IST

कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूरयेथे आषाढीच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेयांनी जाहीर केला आहे.

पंढरपूर वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा
पंढरपूर वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा

मुंबई - पंढरपुरचे विठ्ठल रुख्मिणी (Pandharpur Vithhal Rukmini) हे संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि या विठोबा रखुमाईच्या भेटीसाठी संपूर्ण वारकरी आतुर झाले आहेत. कोरोना काळात दोन वर्षांच्या खंडानंतर पुन्हा आषाढी वारीला (Ashadhi Wari 2022) सुरुवात झाली आहे. वारकरी हरीनामाच्या गजरात पंढरीच्या दिशेने निघाले आहेत. ९ जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. याच आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde)  मोठा निर्णय जाहीर केला आहे.

कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूर येथे आषाढीच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे. यासाठी वारकऱ्यांना वाहनांवर स्टिकर्स लावणे तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिसांकडे नोंदणी करणे, याबाबत व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत.

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी दिलेले प्रमुख निर्देश -

शौचालयांची स्वच्छता महत्त्वाची आहे. त्यासाठी कर्मचारी २४ तास सज्ज राहावेत. त्यांना आवश्यक अशी स्वच्छतेचे उपकरणे, सामुग्री उपलब्ध करून द्या. कपडे बदलण्यासाठीच्या निवारा व्यवस्थेत वाढ करा.

रस्त्यांची स्वच्छता करण्यासाठी गरज पडल्यास खासगी यंत्रणाचा सहभाग घ्यावा. दैनंदिन साफसफाई यासाठी आजुबाजूला असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांची तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या खासगी यंत्रणाचा सहभाग घ्यावा.

मोठा पाऊस झाला तर पाणी साचू नये यासाठी व्यवस्था करा, त्यासाठी पंपाचा वापर करा.

आरोग्य सुविधा औषधे, फवारणी तसेच तापाची, साथीच्या आजारांवरील औषधांचा पुरेसा साठा यांची आतापासूनच व्यवस्था करा.

चिखल, पाऊस, पाणी यामुळे गैरसोय होऊ नये, अशी व्यवस्था करा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक अशा गोष्टी मास्क, सनिटायझर्सची आदी बाबींची व्यवस्था करा.

पिण्याच्या पाण्याची चांगली व्यवस्था करा. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या मदतीने आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी यांनी समन्वय राखावा.

आवश्यक तेथे वैद्यकीय क्षेत्रातील स्वयंसेवी संस्थांची मदत घ्या.

यात्रेचा परिसर खड्डे मुक्त करा

खड्डे विरहित परिसर व्हावा यासाठी तातडीने युद्ध पातळीवर नियोजन करा.

अस्वच्छ, दुर्गंधीयुक्त जागा स्वच्छ करा.

दिंडी मार्गावरील अतिक्रमणे हटवा. हे मार्ग चिखल मुक्त राहील यासाठी उपाययोजना करा. वाहतूक मार्गांचे, व्यवस्थेचे चोखपणे नियोजन करा.

संपूर्ण नियोजनात वारकरी हा केंद्रबिंदू मानून काम करा. पोलिसांनी चांगला बंदोबस्त ठेवावा.‌ कोणत्याही परिस्थितीत त्यांची गैरसोय होऊ नये याकडे लक्ष द्या.

IPL_Entry_Point