Palghar Accident : पालघर येथे जव्हार विक्रमगड मार्गावरील वाळवंटा येथे भीषण अपघात झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथील काही भाविक हे विरार एथे जीवदानी मातेच्या दर्शनासाठी जात होते. या भाविकांच्या जीपचा आणि टेम्पोची धडक झाल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तिघे जण ठार झाले आहे तर ७ जण जखमी झाले आहे. हा अपघात सोमवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास झाला.
मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात गंगुबाई दशरथ कोरडे, निवृत्ती गणपत पागे, सुंदराबाई निवृत्ती पागे या तिघांचा अपघातात मृत्यू झाला आहे. तर आणखी सात जण गंभीर जखमी झाली आहेत. जखमींवर जव्हार येथील पतंगशहा कुटीर रुग्णालय तर काही जणांवर नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी आंबेगण येथील काही भाविक हे विरार येथील जीवदानी मातेच्या दर्शनासाठी जात होते. यावेळी त्यांच्या गाडीला टेम्पोने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. हे सर्व भावीक दर्शनासाठी जात होते. त्यांची जीप ही पालघर येथे जव्हार विक्रमगड मार्गावरील वाळवंटा येथे डॉन बॉस्को स्कूल समोर आली असता एका भरधाव वेगात असलेल्या टेम्पोने त्यांच्या जीपला समोरून जोरदार धडक दिली.
ही धडक ऐवढी जोरदार होती, की या धडकते संपूर्ण जीपचा चक्काचूर झाला आहे. तर टेम्पोचे देखील मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचे दृश्य भयावह होते. या अपघातामुळे या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने रुग्णवाहिका बोलवत जखमी आणि मृत नागरिकांना जव्हार येथील रुग्णालयात दाखल केले.
जीप मधील सर्व प्रवासी हे नाशिक मधील दिंडोरी आंबेगण येथील असल्याची माहिती आहे. हे सर्व जण विरारच्या जीवदानी मातेच्या दर्शनासाठी जात होते. मात्र, वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला.
पोलिसांनी या मार्गावरील अपघातग्रस्त वाहने ही बाजूला करून वाहतूक सुरुळीत केली. या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. ती सोडवण्यासाठी मोठा कालावधी लागला.