राज्यातील तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असून राज्यातील काही जिल्ह्यात उष्णतेची लाट आली आहे. उन्हाचा तडाखा आणि उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले असून उष्माघाताच्या घटनाही वाढताना दिसत आहेत. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांना त्रास होत असून आता पालघरमध्ये उष्माघाताने (Heat Stroke) १६ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अश्विनी विनोद रावते असं उष्माघाताने मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.
ही घटना पालघर जिल्ह्यातील विक्रमगडमधील केव वेडगे पाडा येथे घडली आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास अश्विनीचा उष्माघाताने मृत्यू झाला. अश्विनीचा मृतदेह शेतात आढळून आल्याने हळहळ व्यक्त होत आहे. अश्विनी ही मनोर मधील एस.पी. मराठी विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावीच्या वर्गात शिकत होती.
मंगळवारी दुपारी अश्विनी अकरावीचा पेपर देऊन घरी आली होती. घरात कोणीच नसल्याने ती आई-वडिलांना शोधण्यासाठी नदीवर गेली. दुपारच्या उन्हाचा कडाक्याने तिला भोवळ आली आणि ती शेतातच कोसळली. अश्विनीचं शेत गावापासून काही किलोमीटर अंतरावर असल्याने व दुपारच्या वेळी कोणीही घराबाहेर पडत नसल्याने तिचा मृतदेह तब्बल दोन तास तसाच पडून होता. आई-वडील घरी आल्यानंतर त्यांना अश्विनी घरी दिसली नाही. त्यांनी सगळीकडे त्यांची शोधाशोध केली. त्यानंतर नदीजवळच्या शेतात तिचा मृतदेह पडल्याचे दिसून आले.
सध्या उन्हाचा तडाखा वाढल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. दरम्यान हवामान विभागाने मुंबई, ठाणे व पालघर जिल्ह्यात उष्णतेची लाट येणार असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान,राज्याच्या तापमानात कमालीची वाढ झाली आहे. मुंबईतील सांताक्रुझ येथे मंगळवारी ३९.७ इतके कमाल तापमान नोंदवले गेले. तर कुलाबा येथे ३५.०२ व पालघर जिल्ह्यात ३६.०० अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान होते. मुंबई लगतच्या कल्याण शहरात आज पारा ४० अंशावर होता. कल्याणमध्ये आज ४३.०१ इतके तापमान होते.
लोकसभा निवडणुकांतील प्रचाराबरोबरच तापमानाचा पाराही वाढत आहे. अनेक जिल्ह्यात उष्णतेने लोक हैराण झाले आहेत. शिवसेना आमदार कैलास पाटील यांना आज उष्माघाताचा मोठा फटका बसला. खासदार ओमराजे निंबाळकर यांची सभा भर उन्हात सुरू होती. यावेळी चक्कर येऊन कैलास पाटील रस्त्यावरच कोसळले.
पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तातडीने त्यांना एका गाडीतून रुग्णालयात नेलं. त्यांची प्रकृती स्थिर आहे.