Palghar neharoli murder case : पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील नेहरोली गावात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एकाच घरात आई, वडील, आणि मुलीचा मृतदेह आढळला आहे. यतील आई आणि मुलीचा मृतदेह एका बंद पेटीत तर वडिलांचा मृतदेह हा बाधरूममध्ये सापडला. तसेच मृतदेहांचा वास येऊ नये यासाठी त्यांच्यावर गाद्या देखील टाकण्यात आल्या होत्या. तब्बल १२ दिवस हे मृतदेह घरी पडून होते. तसेच घराला बाहेरून कुलूप लावून होते. त्यांचा मुलगा घरी आल्यावर या घटनेचा उलगडा झाला.
मुकुंद राठोड (वय ७०), कांचन राठोड (वय ६५) हे वयोवृद्ध पती पत्नी व त्यांची दिव्यांग मुलगी संगिता राठोड अशी हत्या झालेल्यांची नावे आहेत. तिघेही नेहरोली गावात गेल्या २० ते २२ वर्षापासून राहत होते. हे कुटुंब मूळचे गुजरात येथील असून ते गेल्या काही वर्षापासून नेहरोली येथे राहत होते. मुकुंद राठोड यांची दोन्ही मुळे ही वसई येथे राहतात. १८ ऑगस्ट पासून हे कुटुंब संपर्काच्या बाहेर असल्याने फॅब्रिकेशन व्यवसाय करत असलेला त्यांचा मुलगा सुहास हा त्यांचा शोध घेण्यासाठी नेहरोली येथे आला. मात्र, घराला कुलूप होते. तसेच आतून वास येत असल्याने त्याने ही माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांच्या उपस्थितीत घराचे कुलूप तोडण्यात आले. यातील दृश्य भयंकर होते.
आई व मुलीचा मृतदेह हा एका बंद पेटीमध्ये कोंबण्यात आला होता. तर वडिलांचा मृतदेह बाथरूममध्ये पडलेला होता. हे तिघेही गेल्या काही दिवसांपासून घरात मृत अवस्थेत असल्याने त्यांचे मृतदेह कुजले होते. आरोपीने मृतदेहांचा बाहेर वास येऊ नये म्हणून त्यांच्या अंगावर जाड गाद्या टाकल्या होत्या. या घटनेची माहिती वाडा पोलिसांना देण्यात आली.
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे. तसेच मृतदेह देखील ताब्यात घेतले आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यावर त्यांचा मृत्यू कसा झाला याची माहिती मिळणार आहे. दरम्यान, कुटुंबीयांची हत्याच झाल्याचा संशय मुलगा सुहास राठोड याने व्यक्त केली आहे.