Palghar News: राज्यात महिला आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराचा घटनेत लक्षणीय वाढ झाली. बदलापूर अत्याचार प्रकरण ताजे असताना महिला अत्याचाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. पालघर जिल्ह्यातील नालासोपारा परिसरात एका ३० वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने तिन्ही आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे.
नरेंद्र मोरया (वय, ३१), प्रकाश सिंह (वय, २६) आणि पंचराज सिंह (वय, ३५) अशी आरोपींची नावे आहेत. महिलेच्या तक्रारीवरून आचोळे पोलीस ठाण्यात बीएनएस कलम ६४, ७० (१) आणि ३५१(२) अन्वये तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती आचोळे पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.
१३ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार, ही घटना भोजीपुरा परिसरातील गावात सोमवारी घडली. पीडित मुलगी शेतात कपडे वाळवण्यासाठी गेले असताना दोन जणांनी तिला पकडून उसाच्या शेतात नेले आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पीडितेचा ओरडण्याचा आवाज ऐकून तिची बहिण घटनास्थळी पोहोचल्यानंतर आरोपी पळून गेला, अशी फिर्याद पीडिताच्या नातेवाईकांनी दिली. या घटनेनंतर पीडिताने आत्मदहन केले. या घटनेत पीडिता गंभीर जखमी झाली. यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिला वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आले.
या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला. एका आरोपीला अटक करण्यात आली असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक मुकेशचंद्र मिश्रा यांनी दिली. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. ही मुलगी आठवीत शिकत होती. याप्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे, असेही मिश्रा यांनी सांगितले. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली असून दोषींविरोधात कडक कारवाईची मागण केली जात आहे.