पुणे : बेकायदेशीर पारपत्र घेऊन पुण्यात राहणाऱ्या एका पाकिस्तानी नागरिकाला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. आरोपीने बनावट पारपत्राद्वारे पुणे ते दुबई प्रवास देखील केला आहे. पोलिस त्याची कसून चौकशी करत आहे.
महम्मद अमान अन्सारी (वय २२) असे अटक करण्यात आलेल्या पाकिस्तानी तरुणाचे नाव आहे. त्याला पोलिसांच्या विशेष शाखेने अटक केली आहे. त्याच्याकडून बनावट भारतीय पारपत्र जप्त केले आहे. या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात फसवणूक, बनावट शासकीय कागदपत्रे तयार करणे, तसेच विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ कलम १४ आणि पारपत्र कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस कर्मचारी केदार जाधव यांनी फिर्याद दिली आहे.
अन्सारी पाकिस्तानी नागरिक आहे. तो शहरात बेकायदा वास्तव्य करत असल्याची माहिती विशेष शाखेला मिळाली होती. तो भवानी पेठेत राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी छापा टाकत चुडामण तालीम चौक परिसरातून अन्सारीला अटक केली. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे बनावट भारतीय पारपत्र सापडले. त्याला अटक करून त्याची चौकशी करण्यात येत आहे. पुण्यात राहण्याचा त्याचा हेतू काय होता. तो दहशतवादी कारवाईमध्ये सामील आहे का? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.