Pune ravivar pethe crime: पुण्यात मध्यवस्तीतील रविवार पेठ येथे आमदार रवींद्र धंगेकर यांच्या कार्यालयाजवळील ज्वेलर्सवर भर दिवसा दरोडा टाकण्यात आला. चोरट्यांनी येथून ५ किलो सोने आणि १० लाख ९३ हजारांची रोकड असा ३ कोटी ३२ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी दीपक माने (वय ३९, रा. साई कॉर्नर, रास्ता पेठ) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दुकानातील कारागिरांनी दागिने आणि रोकड चोरल्याचा संशय माने यांनी व्यक्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माने यांचे रविवार पेठेत ज्वेलर्सचे दुकान आहे. या दुकानात दागिने तयार करून घडवून त्याची विक्री सराफ बाजारातील इतर ज्वेलर्सला केली जाते. पेढींना केली जाते. राज कास्टिंगजवळ कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांचे कार्यालय आहे. दरम्यान, त्यांच्या दुकानात पाच किलो सोने, १० लाख ९३ हजारांची रोकड होती. रविवारी (दि ३१) मध्यरात्री पेढीतील कारागिरांनी सोने, रोकड असा ३ कोटी ३२ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
ही बाब सोमवारी त्यांच्या लक्षात आली. त्यांनी थेट फरासखाना पोलिस ठाण्यात या बाबत तक्रार दिली आहे. फरासखाना पोलीसांनी घटनास्थळी जात पाहणी केली आहे. पोलिसांनी पेढीतील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. याची तपासणी करण्यात आले आहे. फरार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके तयार करण्यात आले आहे. दरम्यान, मध्यवस्तीत घडलेल्या या चोरीमुळे खळबळ उडाली आहे.