Pune Viral News : भारतातील आयटी क्षेत्रात चांगल्या पगाराची नोकरी मिळावी या आशेत मोठ्या प्रमाणात तरुण असतात. देशात आयटी क्षेत्राकडे तरुणांचा ओढा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, त्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत नसल्याने बेरोजगारांचे प्रमाण वाढत आहे. पुण्यात मगरपट्टा येथे असणाऱ्या यूपीएस या आयटी कंपनीत रोजगार मिळावा या आशेने मोठ्या प्रमाणात इंजिनियर तरुणांनी रांगा लावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वॉकइन मुलाखतीसाठी तब्बल ३ हजार हून अधिक तरुण तरुणी रांगेत लागले होते.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये पुण्यातील आयटी कंपनीत ३,००० हून अधिक अभियंते हे वॉक-इन मुलाखतीसाठी एका रांगेत उभे असल्याचा दावा केला जात आहे. ही कंपनी मगरपट्टा येथील आहे. यूपीएस या कंपनीत जॉब मिळावा या हेतूने अनेक तरुण तरुणी या कंपनीबाहेर रांगेत उभे होते.
पुणे पल्सने त्यांच्या एक्स हँडलवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत नोकरीच्या शोधात असणारे तरुण आणि तरुणी मगरपट्टा येथील यूपीएस कंपनीबाहेर रांगेत उभे असल्याचं दिसत आहे. कंपनीत वॉक-इन मुलाखतीसाठी ३,००० हून अधिक अभियंते रांगेत उभे असल्याचं या पोस्टमध्ये म्हटलं आहे. यामुळे पुण्यात बेरोजगारांची संख्या मोठी असल्याचं व त्यांना रोजगार मिळत नसल्याचं पुढं आलं आहे असे, व्हिडिओ खाली लिहिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. अनेक नेटकऱ्यांनी या वर प्रतिक्रिया दिल्या आहेत. “हा शुद्ध छळ आहे. आम्ही करत असलेल्या कन्सल्टिंग वर्कसाठी, आम्हाला मोठ्या प्रमाणात तरुणांना रोजगाराचं आमिष दाखवणं चुकीच आहे. चांगला रिझ्यूम असणाऱ्यांना कामावर ठेवा आणि जर तो नीट काम करत नसेल तर त्याला काढून टाका,” असे एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देतांना लिहिलं आहे. तर दुसऱ्याने “२०१५ मध्ये मी पुण्यात मुलाखतीसाठी गेलो होतो तेव्हा सीटीएसमध्येही अशीच परिस्थिती होती,” असे त्याने म्हटलं आहे. “सुशिक्षित तरुणांमध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. त्यांना भविष्य नाही. पालक त्यांच्या शिक्षणावर अनावश्यक पैसे खर्च करत आहेत,” असे आणखी एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.
ऑक्टोबरमध्ये, कॅनडामध्ये वेटर आणि सर्व्हिस स्टाफच्या जॉबसाठी अनेक भारतीय उच्चशिक्षितांनी रांगा लावल्या होत्या. त्यांचा हा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. हजारो भारतीयांच्या व्हिडिओने सोशल मीडियावर चिंता देखील व्यक्त केली. हा व्हिडिओ तंदुरी फ्लेम रेस्टॉरंटच्या बाहेर शूट करण्यात आला होता, जिथे अनेक तरुण तरुणी हे मुलाखत देण्यासाठी रांगेत उभे होते.
संबंधित बातम्या