Sushma Andhare Osmanabad Speech : शिंदे गटातील आमदारांनी हिंदुत्वासाठी बंड केलं परंतु अब्दुल सत्तार यांनी बंड कशासाठी केलं?, असा सवाल उपस्थित करत शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारेंनी शिंदे गटावर टीका केली आहे. जिकडे हवा तिकडे थवा, अशी अब्दुल सत्तार यांची स्थिती असून त्यांनी अनेक पक्ष बदलल्याचं सांगत अंधारेंनी कुराणचा संदर्भ देत सत्तार यांच्यावर तोफ डागली आहे. त्यामुळं आता यावरून अब्दुल सत्तार आणि सुषमा अंधारे यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी रंगण्याची शक्यता आहे.
उस्मानाबादेतील महाप्रबोधन यात्रेत बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, मी सिल्लोडमध्ये जाहीर सभा घेत कुराणमधील आयत आणि भगदगीतेचे श्लोक सांगितले. परंतु ते सत्तारांना समजणार नाहीत, असं मला वाटलं. इस्लामच्या भाषेत त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना इमान नसल्यानं ते समजू शकले नाहीत. अब्दुल सत्तार यांची इमानदारी कॉंग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना किंवा शिंदे गट या कुणाशीही नाही. जिथं हवा तिथं थवा, अशी त्यांची गत असल्याचं म्हणत सुषमा अंधारेंनी सत्तारांवर सडकून टीका केली आहे.
शिवसेनेतील ४० आमदारांनी हिंदुत्वासाठी बंड केलं. असं असेल तर मग अब्दुल सत्तार यांचं बंड कशासाठी होतं?, ज्यावेळी शिंदे गटाचे सर्व आमदार कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गेले होते त्यावेळी सत्तार गुवाहाटीला गेले नाहीत. सत्तार हिंदू असतील तर त्यांनी कामाख्या देवीच्या दर्शनासाठी जायला हवं होतं. याशिवाय जर ते मुस्लिम असतील तर त्यांना आम्ही इस्लामच्या भाषेतही सांगण्याचा प्रयत्न केल्याचं म्हणत सुषमा अंधारेंनी सत्तार यांच्यावर निशाणा साधला आहे.
संबंधित बातम्या