मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  OPS Strike : माय लॉर्ड, लोकांचे हाल होतायत; सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाविरोधात सदावर्ते हायकोर्टात
Gunaratna Sadavarte
Gunaratna Sadavarte

OPS Strike : माय लॉर्ड, लोकांचे हाल होतायत; सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाविरोधात सदावर्ते हायकोर्टात

16 March 2023, 13:11 ISTGanesh Pandurang Kadam

Gunaratna Sadavarte against OPS Strike : जुन्या पेन्शन योजनेच्या अंमलबजावणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या संपाविरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

Gunaratna Sadavarte against OPS Strike : मराठी आरक्षण विरोध व एसटी महामंडळ विलिनीकरण प्रकरणामुळं वादात अडकलेले अॅड. गुणरत्न सदावर्ते हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मुद्द्यावर राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाविरोधात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या संपामुळं महाराष्ट्राच्या जनतेचे हाल होत आहेत. त्यामुळं न्यायालयानं यात हस्तक्षेप करावा, अशी मागणी सदावर्ते यांनी केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

केंद्र सरकारनं आणलेल्या नव्या पेन्शन योजनेला सरकारी कर्मचाऱ्यांचा विरोध आहे. मागील काही दिवसांपासून कर्मचारी संघटना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करत आहेत. मात्र, आर्थिक व्यवहार्यतेचा मुद्दा पुढं करत राज्य सरकार अद्याप त्यावर निर्णय घेतलेला नाही. कर्मचारी संघटनांनी संपाचा इशारा दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जुन्या व नव्या योजनेचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी समिती नेमण्याची घोषणा केली आहे. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही.

कर्मचारी संघटनांनी कालपासून काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. त्यामुळं राज्यभरात गोंधळ उडाला आहे. सरकारी कामं रखडली आहेत. सरकारी रुग्णालयातील शस्त्रक्रिया पुढं ढकलण्यात आल्या आहेत. विविध प्रकारच्या प्रमाणपत्रांच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांनाही संपाचा फटका बसला आहे. हाच मुद्दा पुढं करत गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

महाराष्ट्रातील जनतेचे हाल होत असल्यानं न्यायालयानं तातडीनं यात हस्तक्षेप करावा व संपकरी कर्मचारी संघटनांना आवश्यक ते आदेश द्यावेत, अशी मागणी सदावर्ते यांनी याचिकेत केली आहे. न्यायालयानं सदावर्ते यांची याचिका दाखल करून घेतली असून त्यावर उद्या सुनावणी होणार आहे.