मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ajit Pawar : उपमुख्यमंत्री ऐवजी गृहमंत्री करा म्हटले होते; पण..; अजित पवारांच्या वक्तव्यामुळे चर्चां

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री ऐवजी गृहमंत्री करा म्हटले होते; पण..; अजित पवारांच्या वक्तव्यामुळे चर्चां

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Sep 23, 2022 03:33 PM IST

Ajit pawar Statement : अजित पवार आज पुण्यात होते. त्यांनी शहर कार्यकरणीची आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी केलेल्या एका विधानामुळे चर्चांना उधाण आले आहे.

Ajit Pawar (Photo by Bhushan Koyande/HT Photo)
Ajit Pawar (Photo by Bhushan Koyande/HT Photo) (HT PHOTO)

पुणे : अजित पवार हे त्यांच्या रोख ठोक आणि तेवढ्याच मिश्किल स्वभावामुळे ओळखले जातात. त्यांची अनेक व्यक्तव्ये ही राजकीय वर्तुळात खळबळ उडवत असते. असेच एक वक्तव्य त्यांनी आज पुण्यात एका कार्यक्रमात केले. अजित पवार यांनी शहर कार्यकारणीची आज बैठक घेतली. या बैठकीत कार्यकर्त्यांना संबोधित करताना अजित पवार म्हणाले, ''जेव्हा जेव्हा उपमुख्यमंत्री झालो तेव्हाच गृहमंत्री करा म्हंटले होते. पण वरिष्ठांनाही वाटतं याला गृहमंत्रीपद दिलं तर हा आपलंही ऐकणार नाही.'' अजित पवारांच्या या व्यक्तव्यामुळे सभागृहात हशा पिकला असला तरी त्यांनी त्यांच्या मनातली खदखद पुन्हा एकदा बोलून दाखवली अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

अजित पवार आज पुणे शहराच्या दौऱ्यावर होते. त्यांनी आज पुणे शहर कार्यकारीणी आढावा बैठक घेतली. यावेळी कार्यकर्त्यांशी ते बोलत होते. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारचा समाचार घेत असतांना एका कार्यकर्त्याने त्यांना तुम्हीच गृहमंत्री व्हा असे म्हंटले. यावर अजित पवार म्हणाले की, जेव्हा जेव्हा सरकारमध्ये मला उपमुख्यमंत्री केले गेले, तेव्हा मी वरिष्ठांना म्हटले होते की मला गृहखाते द्या. पण, वरिष्ठांना वाटते की याला गृहखाते दिले की हा आपले काही ऐकणार नाही. याहीवेळेस मी गृहखात्याची मागणी केली होती. पण पहिल्यांदा अनिलराव देशमुख यांना हे खाते दिले गेले. ते गेल्यावर पुन्हा मला गृहमंत्री पद मला द्या म्हणालो तर ते वळसे पाटलांना दिलं. काही झाले तरी वरिष्ठांपुढे बोलता येत नाही. असे म्हणताच त्यांनी दोन्ही कानांना हात लावला. यामुळे सभागृहात हशा पिकला.

या नंतर अजित पवार म्हणाले, मला जे योग्य वाटेल ते मी घेतले. आपल्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाला तर मी जीवाचे रान करेल. त्याच्या पाठिशी उभा राहील. पण तोच जर चुकीचा असेल तर मी त्याच्यावर पांघरुण घालणार. पण पांघरुन संपतील एवढ्या चुका तुम्ही करू नका, असेही पवार म्हणाले. दरम्यान त्यांच्या या व्यक्तव्यामुळे अजित पवार यांनी त्यांच्या मनातील खदखद पुन्हा कार्यकर्त्यांसमोर बोलून दाखवली अशीच चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात आज रंगली होती.

 

IPL_Entry_Point

संबंधित बातम्या

विभाग