maharashtra assembly budget session 2023 : विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा अखेरचा दिवस चांगलाच वादळी ठरण्याची शक्यता आहे. कर्मचारी संप आणि अवकाळी पावसाच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले आहे. शिंदे-फडणवीस सरकारला कर्मचारी आणि शेतकऱ्यांच्या समस्यांचं गांभीर्य नसल्याचा आरोप करत विरोधकांनी सभात्याग करत विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाच्या आमदारांनी टोपलीत कांदे आणि द्राक्षे घेऊन नुकसानग्रस्त भागांमधील शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याची मागणी केली आहे. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचे आमदार उपस्थित होते.
शेतकरी आंदोलन, अवकाळी पाऊस आणि कर्मचारी संपाच्या मुद्द्यावरून आज महाविकास आघाडीच्या आमदारानी शिंदे-फडणवीस सरकारला चांगलंच धारेवर धरलं. राज्यातील अवकाळी पाऊस आणि कर्मचाऱ्यांच्या संपावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी स्थगन प्रस्ताव मांडला. परंतु विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्थगन प्रस्ताव फेटाळून लावल्यामुळं विरोधक चांगलेच आक्रमक झाले. त्यानंतर विरोधी आमदारांनी सभात्याग करत विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरू केलं. कांद्याला भाव मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या अन्यथा खुर्च्या खाली करा, अशा घोषणा विरोधकांनी दिल्या आहे. याशिवाय शेतकरी आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर शिंदे-फडणवीस सरकार गंभीर नसल्याचा आरोपही विरोधकांनी केला आहे.
विधानसभेत अजित पवार आक्रमक...
अवकाळी पावसामुळं मराठवाड्यात आठ जणांना मृत्यू झालेला आहे. १०० च्या आसपास जनावरं दगावलेली आहेत. शेतकरी संकटात असतानाच सरकारी कर्मचारी संपावर आहेत. यावर शिंदे-फडणवीस सरकारनं तोडगा काढणं आवश्यक असताना त्यावर कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीये. त्यामुळं विधानसभा अध्यक्षांनीच सरकारला तशा सूचना द्याव्यात, अशी मागणी करत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला चांगलंच धारेवर धरलं आहे.