recruitment fare in Baramati : बेरोजगरांसाठी रोजगार मिळवण्यासाठी सुवर्ण संधी आहे. बारामती येथे २ आणि ३ मार्च रोजी नमो महारोजगार मेळाव्यात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांतील विविध क्षेत्रातील युवक युवतींना रोजगार दिला जाणार आहे. या साठी आता पर्यन्त १२० पेक्षा अधिक कंपन्यांनी सहभाग नोंदवला आहे.
या रोजगार मेळाव्या संदर्भात माहिती देतांना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, बारामती येथे २ आणि ३ मार्च असा दोन दिवस आयोजित करण्यात येणार आहे. या मेळाव्यात नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. या मेळाव्यात रोजगार इच्छूक असणाऱ्या दहावी, बारावी, आय.टी.आय., पदविका, पदवीधर, पदव्युत्तर पदवी प्राप्त उमेदवारांच्या मुलाखती घेऊन तेथेच त्यांना रोजगाराच्या संधी दिल्या जाणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त उमेदवारांनी मेळाव्यासाठी नावनोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या मेळाव्यामध्ये युवक व युवतींनी सहभागी होण्यासाठी https://rojgar.mahaswayam.gov.in/#/register या लिंकवर जावून नोंदणी करावी आणि नमो महारोजगार मेळाव्यात सहभागी होणाऱ्या नियोक्त्यांसाठी https://rojgar.mahaswayam.gov.in/#/employer_registration ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.
महारोजगार मेळाव्यात विविध विभागांच्या योजनांची, स्टार्टअप व विविध महामंडळे यांच्याद्वारे स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य देणाऱ्या योजनांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच मेळाव्यात अल्पमुदतीचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थाही सहभागी होणार असल्याने कौशल्य प्रशिक्षणास इच्छुक उमेदवारांना त्याचा लाभ घेता येईल. उमेदवारांनी मेळाव्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष मुलाखतीस येताना सर्व शैक्षणिक कागदपत्रे, पासपोर्ट आकाराची छायाचित्रे, अर्ज, आधार कार्डच्या प्रती सोबत आणणे आवश्यक आहे, असे पवार यांनी सांगितले.