कुणी कितीही निष्ठेच्या गप्पा मारत असलं तरी खरी निष्ठा काय असते ते उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचे खंदे कार्यकर्ते दाखवून देतील. महाराष्ट्राच्या राजकारणात २०२४ नंतर दोनच चेहरे राहतील. एक म्हणजे शरद पवार आणि दुसरे उद्धव ठाकरे. त्याचबरोबर शरद पवार अजित पवार गटाला २०२४ च्या निवडणुकीत माती चारतील, असं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आज संजय राऊत यांचा वाढदिवस असून त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना हे वक्तव्य केलं आहे. दरम्यान, राऊतांनी सुषमा अंधारेंचं कौतुक केलं आहे. अंधारे यांनी राऊतांना पत्र लिहून वाढदिवस आणि भाऊबीजेच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.
संजय राऊत म्हणाले की, शरद पवार संकटाला सामोरं जात खंबीरपणे उभे आहेत. बाळासाहेब ठाकरे आज हयात नाहीत. पण त्यांच्या विचारांची मशाल उद्धव ठाकरे समर्थपणे पुढे घेऊन जात आहेत. २०२४ च्या निवडणुकीनंतर हेच दोन चेहरे महाराष्ट्राच्या राजकारणात दिसतील. आज अजित पवार व शरद पवार कितीही एकत्र दिसत असले तरी काही कौटुंबिक गोष्टी असतात. संस्थात्मक गोष्टी असतात. त्या आम्हाला माहित आहेत. निवडणुकीत शरद पवार अजित पवार गटाला माती चारतील. बारामतीच्या कुस्तीतही शरद पवारच मैदान मारतील, असं संजय राऊत म्हणाले.
कोणत्याही पक्षाशी निष्ठा ठेवणे हे महाराष्ट्रावर निष्ठा ठेवण्यासारखे आहे, असं मी मानतो. त्यामुळे सत्ता येते, सत्ता जाते पण संकट आलं म्हणून बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी बेईमानी करणाऱ्यांना महाराष्ट्रात स्थान नाही, असं टोला राऊतांनी लगावला आहे.
संबंधित बातम्या