Mumbai Onion rates Today: देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे. मुंबई आणि दिल्ली यांसारख्या शहरातील घाऊक बाजारात कांद्याचे दर ४० ते ६० रुपयांवरून ७० ते ८० रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या काही दिवसांत कांद्याचे दर दुप्पटीने वाढल्याने ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आले आहे. याशिवाय, वाढत्या महागाई कांद्याची विक्री कमी झाल्याने विक्रेत्यांचेही नुकसान होत आहे.
मुंबईत सध्या कांदा ८० रुपये प्रतिकिलो किलोने विकला जात आहे. तर, किरकोळ बाजारात कांद्याची ६० ते ८० रुपये किलोने विक्री केली जात आहे. राज्यातील बाजारसमित्यांमध्ये कांदा आणि लसूण यांची आवक कमी झाल्यामुळे तुटवडा निर्माण झाला आहे. पुढील एक महिनाभर कांद्याचे दर आणि पुढील तीन ते चार महीने लसणाचे दर तेजीतच राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कांद्यासह लसणाचे भावही कडाडले आहे. मुंबईत एक किलो लसूण खरेदी करण्यासाठी ग्राहकांना ४०० रुपये मोजावे लागत आहेत. यामुळे नागरिकांनी बाजारभावाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तसेच लवकरच या दरांमध्ये घट होईल, अशीही आशा ते करत आहेत.
दिवाळीत नाशिकसह इतर भागातील बाजार समित्या आठवडाभर बंद ठेवण्यात आल्या. तसेच शेतकऱ्यांकडे असलेला उन्हाळी कांदा संपत आलेला आहे. शेतकऱ्यांकडे फक्त २ ते ३ टक्के कांदा शिल्लक राहिल्याने त्याचा परिणाम दरवाढीवर झाला आहे. तर खरीप हंगामातील कांदा नुकताच काढणीला आला आहे. त्यामुळे त्याला सुद्धा ६० रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे.
लोकसभा निवडणुकीदरम्यान भारतीय जनता पक्षाला कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या टीकेला सामोरे जावे लागले होते, परिणामी महाराष्ट्रातील कांदा उत्पादक भागातील १२ जागांचे नुकसान झाले होते. यंदा कांद्याचे दर वाढल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे; मात्र, सोयाबीन आणि कापसाचे घसरलेले दर सत्ताधारी महायुतीसाठी चिंतेचे कारण ठरू शकते, राज्यात २० नोव्हेंबरला मतदान होत आहे. भारतातील सर्वात मोठा कांदा उत्पादक जिल्हा असलेल्या नाशिकमध्ये लासलगाव घाऊक बाजारपेठ असून कांद्याची देशातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. उन्हाळी पिकासाठी शेतकऱ्यांना सध्या प्रतिक्विंटल सहा हजार रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळत असून, नवीन साठा येईपर्यंत भाव चढेच राहण्याची शक्यता आहे.