Onion Price: नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात कांद्याची आवक घटल्याने कांद्याच्या भावात ५ ते १० रुपयांनी वाढ झाली आहे. दोन आठवड्यापूर्वी १५- १८ रुपये किलोने विकला जाणारा कांदा आता २५ ते ३० रुपये किलोने खरेदी करावा लागत आहे. किरकोळ बाजारात कांद्याचे दर किलोमागे ३६ ते ४० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. याशिवाय, कांद्याच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. कांद्याचे दर गगनाला भिडल्याने सर्वसामन्यांच्या खिशाला कात्री लागली आहे.
नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात दिवसाला ५० गाड्यांची आवाक होत आहे. दररोज सरासरी १२५ वाहने असताना आता केवळ ७० वाहने येत आहेत. याशिवाय, कांद्याच्या दरात झालेली वाढ म्हणजे देशाच्या उत्तर भागात कांद्याला वाढलेली मागणी आहे. दोन आठवड्यापूर्वी घाऊक बाजारात १० ते १५ रुपये किलोने कांदा विकला जात होता. त्यानंतर गेल्या आठवड्यात कांद्याचे दर प्रतिकिलो २० ते २२ रुपयांवर पोहोचले. मात्र, यात आणखी वाढ झाली असून हाच कांदा आता २५ ते ३० रुपयांनी विकला जात आहे.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीचा माल साठवून ठेवला आहे, जो जास्त काळ टिकतो आणि त्याचा पुरवठा पावसाळ्यात केला जातो. मात्र, कांद्याचा साठा बराच कमी झाला असून त्याचा परिणाम सध्याच्या आवकेवर होत आहे. पाच किलो खरेदी करणारे आता एक किलो खरेदी करत आहेत. येत्या काही दिवसांत कांद्याचे दर आणखी वाढू शकतात. कमी साठा येत असल्याने तो ५० रुपये किलोपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
कांद्याचे दर वाढल्याने सर्वसामन्यांचे बजेट कोलमोडले आहे. निवडणुकीनंतर परिस्थिती बिघडली आहे. कांदा, बटाटे, लसूण, तांदूळ, भाजीपाला यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढताना दिसत आहेत. महाराष्ट्रात पावसाचे आगमन झाले असून अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. पावसाळ्यात भाजीपाला आणि फळे यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत वाढ झाल्याचे पाहायला मिळते.
संबंधित बातम्या