मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  शेतकऱ्यांची काय थट्टा लावली राव..! ८२५ किलो कांदा विकला मात्र शेतकऱ्याला पदरचा रुपया द्यावा लागला

शेतकऱ्यांची काय थट्टा लावली राव..! ८२५ किलो कांदा विकला मात्र शेतकऱ्याला पदरचा रुपया द्यावा लागला

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 25, 2023 10:33 PM IST

Onion price : सोलापुरात एका शेतकऱ्याने८२५किलो कांदा विकला, त्यानंतरही त्याला आपल्याचपदरचाएक रुपया व्यापाऱ्याला द्यावा लागला. यामुळेशेतकरी वर्गात असंतोष उफाळत आहे.

कांदा दरात घसरण
कांदा दरात घसरण

Onion Price :   गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला होता. नैसर्गिक आपत्तीतून कसेबसे वाचल्यानंतर दर पडल्यामुळे शेतकऱ्यांना मिळेल त्या दराने आपल्या मालाची विक्री करावी लागते.  दोन दिवसांपूर्वी सोलापुरातील एका शेतकऱ्याला ५१२ किलो कांदा विकल्यानंतर व्यापाऱ्याने २ रुपयांचा चेक त्याच्या हातावर टेकवत १५ दिवसात वठेल असे सांगितले होते. हे प्रकरण ताजे असताना सोलापुरात आणखी एक असाच प्रकार समोर आला आहे. ८२५ किलो कांदा विकल्यानंतर उलट शेतकऱ्यालाच एक रुपया अडत व्यापाऱ्याला द्यावा लागला आहे. 

कांद्याचे भाव कोसळल्यामुळे पेरणीचा खर्च तर सोडाच मार्केटमध्ये आणण्याचा खर्चही शेतकऱ्यांना मिळत नाही, उलट स्वत:च्या खिशातून पैसे द्यावे लागत असल्याचे समोर येत आहे. सोलापुरात एका शेतकऱ्याने ८२५ किलो कांदा विकला, त्यानंतरही त्याला आपल्याच पदरचा एक रुपया  व्यापाऱ्याला द्यावा लागला. यामुळे शेतकरी वर्गात असंतोष उफाळत आहे. कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने घाऊक बाजारात कांदा १० रुपये किलो दराने विकला जात आहे. गेल्या आठवड्यापासून कांद्याच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण सुरूच असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.


बंडू भांगे या कांदा उत्पादक शेतकऱ्याने सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एस. एन. जावळे या कांदा अडत व्यापऱ्याकडे १७ गोणी कांदा आणला होता. याचे वजन कांद्याचे वजन ८२५  किलो  झाले. याला प्रतिकिलो १ रुपये दराप्रमाणे ८२५ रुपये मिळाले. त्यातून हमाली, तोलारी, गाडी भाडं सगळे मिळून ८२६ रुपये झाले. काद्यांची पट्टी आली ८२५ आणि खर्च झाले ८२६ रुपये. त्यामुळे  ८२५ किलो कांदा विकूनही शेतकऱ्याला पदरचा एक रुपया आडत्याला देण्याची वेळ आली

सोलापूर शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे यांनी एक रुपया वजा असलेली शेतकऱ्याची पट्टी फेसबुकवर पोस्ट केली आहे. हा सौदा एक फेब्रुवारी रोजी झाला होता. 

दोन-तीन दिवसापूर्वी सोलापूर कृषी उत्पन्न बाजारात राजेंद्र तुकाराम चव्हाण या शेतकऱ्याने १० पोती कांदा विक्रीसाठी आणला होता. ५१२ किलो कांदा विकल्यानंतर प्रति किलो १ रुपये दराने त्याच्या हाती ५१२ रुपये येणं अपेक्षित होतं. मात्र ५०९ रुपयांचा खर्च वजा करून त्याच्या हाती फक्त दोन रुपये आले आहेत. भाडे, हमाली, तोलाई आदींसाठीचे ५०९ रुपये कापून घेण्यात आले. या दोन रुपयांसाठीही व्यापाऱ्याने शेतकऱ्याला चक्क चेक दिला आणि १५ दिवसांनी वठेल असं सांगितलं. शेतकऱ्याची ही क्रूर थट्टा सुरु असल्याचा संताप राजू शेट्टी यांनी व्यक्त केला आहे.

WhatsApp channel