केंद्र सरकारने ‘प्राईज स्टॅबिलायझेशन स्कीम’ अंतर्गत नाफेड मार्फत खरेदी केलेला कांदा मुंबई आणि उपनगरातील नागरिकांसाठी खरेदी करण्यास नुकताच उपलब्ध झालेला आहे. नाफेडच्या विशेष अतिरिक्त साठयातील हा कांदा मोबाईल मोबाईल व्हॅनमधुन रुपये ३५ प्रति किलो या दरात सामान्य नागरिकांना मिळणार आहे. एक किलोच्या पॅकिंगमध्ये हा कांदा उपलब्ध होत आहे.
केंद्र सरकारच्यावतीने ग्राहकांना नाफेडच्या माध्यमातून सवलतीच्या दरात कांदा विक्री करण्यात येत असून त्याचा दर ३५ रूपये किलो आहे. ग्राहकांना एक व दोन किलोच्या पॅकिंगमध्ये हा कांदा खरेदी करता येत आहे. मुंबई, मुंबई उपनगरे, नवी मुंबई व पनवेल या महानगरपालिकांच्या क्षेत्रामध्ये मोबाईल व्हॅनद्वारे ही कांदा विक्री करण्यात येत आहे.
नाफेडमार्फत खरेदी केलेल्या या कांद्याची विक्री सामान्य नागरिकांना सुलभतेने आणि भरपूर प्रमाणात व्हावी म्हणून शहरातील प्रमुख बाजारात या मोबाईल व्हॅन्स उभ्या केल्या जाणार आहेत. या शिवाय मोठ्या हौसिंग कॉलनी, वसाहती आणि लोकवस्ती असलेल्या ठिकाणी देखील या व्हॅन सोयीच्या वेळेस उभ्या रहातील. मुंबई शहर आणि उपनगरातील अनेक मोठ्या गृहनिर्माण संस्थांशी संपर्क आणि समन्वय साधून अशा सोसायटीमध्ये या मोबाईल व्हॅन कांदा विक्रीसाठी दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे.
गेल्या वर्षी देखील नाफेडच्या या विशेष अतिरिक्त कांद्याची किरकोळ विक्री मुंबई आणि उपनगरात अशाच प्रकारे केली गेली होती. त्यावेळी नागरिकांकडून या वाजवी किमतीतील कांद्याचे उत्स्फूर्तपणे स्वागत झाले होते आणि त्या खरेदीस उदंड असा प्रतिसाद लाभला होता. नाफेड आणि केंद्र सरकारच्या या उपक्रमाबद्दल अनेक नागरीकांनी त्यावेळी समाधान व्यक्त केले होते.
सद्यस्थितीत ठराविक विक्री केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना कांदा उपलब्ध होत असून येत्या काळात विक्री केंद्र वाढवली जाणार आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून काही माध्यमातून नाफेडचा कांदा बाजारात आला असल्याची अफवा पसरली आहे. त्यामुळे भाव पडण्याच्या भीतीने कांदा उत्पादक शेतकरी घाबरलेला आहे. काही ठिकाणी लासलगाव, निफाड बाजारात नाफेडचा मोठा स्टॉक आला असल्याची अफवा पसरविण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर नाफेडचे संचालक केदा आहेर यांनी सांगितले की नाफेडने असा कोणताही कांदा बाजारात आणि नाशिकच्या बाजारात आणलेला नाही. तरी शेतकऱ्यांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले. तसेच नाफेडचा बफर स्टॉक मधील कांदा स्थानिक बाजारात विक्री केला जात नाही असे देखील त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र आता मुंबईत हा कांदा दाखल झाला आहे.