Kanadgaon Sambhajinagar Ganeshotsav : महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या शहरांमध्ये भाविक गणेश मंडळांना भेट देत लाडक्या बाप्पाचं दर्शन घेत आहे. परंतु आता संभाजीनगर जिल्ह्यातील कानडगावातील नागरिकांनी एकत्र येत राज्याला एकतेचा संदेश दिला आहे. गावातील सर्व नागरिकांनी एकत्र येत 'एक गाव, एक गणपती आणि एक गणेशोत्सव' असा उपक्रम राबवला आहे. त्यामुळं अनेकांनी या उपक्रमाचं कौतुक करत इतर गावांनी या उपक्रमाचं अनुकरण करण्याचं आवाहन केलं आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील कानडगावात तरुणाईसह जेष्ठ ग्रामस्थांनी यंदाचा गणेशोत्सव 'एक गाव एक गणपती' या उपक्रमाद्वारे साजरा करण्याचं ठरवलं आहे. गावातील सर्व नागरिकांनी एकत्र येत गणेश मंडळाची स्थापना केली आहे. गावातील तरुणाईच्या हाती गणेश मंडळाची सूत्र देण्यात आली आहे. तुकाराम टेकणे यांना गणेश मंडळाचं अध्यक्ष करण्यात आलं तर ईश्वर गायकवाड यांच्या गळ्यात उपाध्यक्षपदाची माळ पडली आहे. गावातील स्व. काकासाहेब शिंदे चौकात गणेश मंडळाकडून मंडप उभारण्यात आलं असून त्यात लाडक्या बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
गणपतीच्या दर्शनाचा आणि आरतीचा मान गावातील जेष्ठ नागरिक, महिला आणि तरुणांना टप्प्याटप्प्याने देण्यात येत आहे. शिवारातील अनेक भाविकांनी कानडगावातील या अनोख्या उपक्रमाचं कौतुक करत गावातील बाप्पांचं दर्शन घेतलं आहे. जिल्ह्यातील गंगापूर, पैठण, वैजापूर, कन्नड, सिल्लोड आणि सोयगाव या ग्रामीण भागांमध्ये देखील भाविकांनी एकत्र येत एक गाव एक गणपती या उपक्रमातून बाप्पांची प्रतिष्ठापना करण्यास सुरुवात केली आहे. दीड दिवसांच्या विसर्जन झालं असून त्यानंतर आता उद्या पाचव्या दिवसांच्या गणपतीचं विसर्जन केलं जाणार आहे.
संबंधित बातम्या