Kavathe Mahankal Crime News Marathi : कॉलेजमध्ये झालेल्या किरकोळ वादातून एका विद्यार्थ्याची हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ शहरात ही घटना घडली असून त्यानंतर आता पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. धुळा कोंडीबा कोळेकर असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. आरोपींनी कवठेमहांकाळ शहरातील एसटी स्टँडवर धारदार शस्त्रांनी वार करत धुळा कोळेकर याची निर्घृण हत्या केली आहे. त्यानंतर आता सांगली पोलिसांनी या प्रकरणातील तीन आरोपींना अटक केली असून त्यांची चौकशी केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ शहरातील एका महाविद्यालयात धुळा कोळेकर या तरुणाचा काही लोकांशी वाद झाला होता. त्यामुळं सूडाच्या भावनेने पेटलेल्या आरोपींनी शनिवारी दुपारच्या सुमारास एसटी स्टँडवर उभा असलेल्या धुळा कोळेकर याच्यावर जीवघेणा हल्ला केला. आरोपींनी चाकू, कोयता आणि अन्य धारदार शस्त्रांनी वार करत धुळाला जखमी करत घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर उपस्थितांनी जखमी तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झालेला होता. त्यानंतर मृत तरुणाच्या नातेवाईकांनी आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली.
पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत तीन आरोपींना अटक केली आहे. एकमेकांकडे रागाने बघितल्यामुळं धुळाची हत्या करण्यात आल्याचा संशय मृत तरुणाच्या नातेवाईकांकडून व्यक्त करण्यात आला आहे. दीड महिन्यांपूर्वी धुळा कोळेकर याचा कॉलेजमधील काही तरुणांशी वाद झाला होता. परंतु दररोज सर्वजण एकमेकांसमोरून जात असल्याने वाद आणखी पेटण्याची शक्यता होती. त्यातच खुन्नस दिल्याने आरोपींनी धुळा कोळेकर याची हत्या केल्याने कवठेमहांकाळ शहरात खळबळ उडाली आहे.