Bhugaon manas lake News : : पुण्यातील मुळशी तालुक्यातील भुगाव येथील प्रसिद्ध मानस लेकमध्ये मोटार कोसळून एक जण ठार झाला आहे. ही घटना मंगळवारी उघडकीस आली. या प्रकरणी पौड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, हा अपघात आहे की घातपात या दृष्टीने देखील पोलिस तपास करत आहेत.
रामदास पवार (रा. आंबेगाव) असे तलावात करसह पडून मृत्युमुखी पडलेल्या मोटारचालकाचे नाव आहे. ही घटना सोमवारी सकाळी भूगाव परिसरातील मानस लेकमध्ये घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी मानस लेकमध्ये येथील काही स्थानिक नागरिकांना एक कार तरंगताना दिसली. स्थानिक नागरिकांनी याची माहिती पौड पोलिसांना दिली. पौड पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला.
तसेच एका क्रेनच्या मदतीने ही गाडी पाण्याबाहेर काढण्यात आली. या अपघाताची माहिती ही मुळशी आपत्ती व्यवस्थापन कक्षाला देखील देण्यात आली. मोटार पाण्यातून बाहेर काढली तेव्हा त्यात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी गाडीच्या काचा फोडल्या. तसेच मृतव्यक्तीला बाहेर काढण्यात आले. गाडी तपासली असता त्यात आढळलेल्या कागद पत्राद्वारे मृत व्यक्ति ही रामदास पवार असल्याचे कळले.
रामदास पवार हे त्यांच्या मित्रांसोबत मानस लेक परिसरात असलेल्या एका हॉटेलमध्ये गेले होते. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास ते कुणाशी न बोलता बाहेर पडले. तेथून परत येत असताना त्यांची गाडी ही तलावात पडली असावी अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.