Pune GBS Update : पुण्यात गुलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) चा कहर वाढत आहे. बुधवारी आणखी एका जीबीएस बाधित व्यक्तीचा मृत्यू झाला असून आणखी ६ जणांना या आजाराची लागण झाल्याचे निष्पन्न झालं आहे. दरम्यान, पुणे महापालिकेने या आजारातून बरे झालेल्या रुग्णांच्या आरोग्याचा फॉलोअप देखील घेण्यास सुरुवात केली आहे.
पुण्यात बुधवारी आणखी एका संशयित जीबीएसबाधित रुग्णाचा मृत्यू झाला. खडकवासला येथील ५९ वर्षीय व्यक्तीचा काशीबाई नवले वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या व्यक्तीला हायपोटेन्सिव्ह शॉक, पल्मोनरी एम्बोलिझम आणि जीबीएस असल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यामुळे राज्यातील एकूण जीबीएस मृत्यूंची संख्या ८ झाली आहे, अशी माहिती पीएमसीच्या आरोग्य सेवा सहसंचालक डॉ. बबिता कमलापूरकर यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, जीबीएसमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीला १० फेब्रुवारी रोजी अशक्तपणा व शरीरातील शक्ति कमी होत असल्याची लक्षणे दिसली. यामुळे त्या व्यक्तीला दवाखान्यात भरती करण्यात आले होते. या व्यक्तीला पाण्याचा ग्लास देखील पकडता येत नव्हता. तसेच शर्टचे बटणही लावता येत नव्हते. एनसीव्ही चाचणीत या व्यक्तीला न्यूरोपैथी असल्याचे आढळून आले. तर ११ फेब्रुवारीरोजी पहाटे या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती राज्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान, पूर्णपणे बरे झालेल्या जीबीएस रुग्णांच्या आरोग्याचा आढावा घेण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. त्यांच्या आरोग्यावर व शरीरातील हालचालींवर देखील लक्ष ठेवले जाणार आहे. तसेच रुग्ण घरी गेल्यावर त्याच्या शरीरात काही बदल दिसतात का ? याची देखील माहिती घेतली जाणार असल्याचे पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.
बुधवारी आणखी ६ संशयित गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) रुग्णांची नोंद झाल्याने एकूण रुग्णांची संख्या २०० च्या पुढे गेली आहे. महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या २०३ वर पोहोचली आहे. या २०३ संशयित जीबीएस रुग्णांपैकी १७६ रुग्णांना जीबीएस झाल्याचे आढळले आहे, अशी माहिती डॉ. कमलापूरकर यांनी दिली.
मंगळवारपासून रुग्णांचे मॉनिटरिंग सुरू करण्यात आल्याचे मनपा अधिकाऱ्यांनी सांगितले. नियमित पाठपुरावा बरे झाल्याचा कालावधीचे मूल्यांकन यामुळे बाधित रुग्णांवर उपचार करण्यास मदत होईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जीबीएसच्या उद्रेकानंतर बाधित २०३ रुग्णांपैकी १०९ जणांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहे. त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या ८६ संशयित रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू असून त्यापैकी ५२ रुग्ण अतिदक्षता विभागात तर २० रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती डॉ. कमलापूरकर यांनी दिली.
या २०३ जीबी रुग्णांपैकी ४१ रुग्ण मनपा हद्दीतील, ९४ रुग्ण मनपा क्षेत्रातील नव्याने समाविष्ट झालेल्या गावांतील, २९ रुग्ण पिंपरी-चिंचवड महापालिकेतील आहेत. यामध्ये पुणे ग्रामीणमधील ३१, तर इतर जिल्ह्यातील ८ जणांचा समावेश असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.
संबंधित बातम्या