मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  अधुरी एक कहाणी.. लग्नानंतर पाचव्याच दिवशी नवरदेवाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

अधुरी एक कहाणी.. लग्नानंतर पाचव्याच दिवशी नवरदेवाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Nov 24, 2022 11:06 PM IST

लग्नाच्या पाचव्याच दिवशी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने नवरदेवाचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना बारामती तालुक्यात घडली आहे. लग्नाच्या पाचव्या दिवशी विधवा झालेल्या नववधुच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे.

लग्नानंतर पाचव्याच दिवशी नवरदेवाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू
लग्नानंतर पाचव्याच दिवशी नवरदेवाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

पुणे – सुखी संसाराची हजारो सोनेरी स्वप्ने घेऊन लग्नाच्या बेडीत अडकलेल्या एका जोडप्याच्या जीवनात नियतीने काही वेगळेच लिहून ठेवले होते. धूमधडाक्यात लग्न झाले लग्नाच्या रात्री जल्लोषात वरात नववधू-वराची वरात काढली गेली. मात्र जेथून वरात काढण्यात आली त्याच मंडपातून वराची अंत्ययात्रा काढण्याची वेळ कुटूंबावर आली.लग्नाच्या पाचव्या दिवशी नवरदेवाचा हृदयविकाराचे झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. पुण्यातील बारामती तालुक्यातील माळेगावमध्ये ही घटना घडली.

सचिन येळे (वय २८ ) असे मृत्यू झालेल्या नवरदेवाचं नाव आहे. सचिन आणि हर्षदा यांचा विवाह १९ नोव्हेंबर २०२२ रोजी बारामती तालुक्यातील शारदा नगर येथे नातेवाईक व मित्रमंडळींच्या उपस्थितीत पार पडला. मात्र नियतीला काही दुसरेच मंजूर होते. लग्नाच्या पाचव्याच दिवशी नवरदेवाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने हर्षदा पाचव्या दिवशी विधवा झाली. मुलाच्या अचानक मृत्यूने येळे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

सचिन कुटूंबातील सगळ्यात लहान असल्याने त्याचा विवाह येळे कुटुंबियांनी धुमधडाक्यात केला. लग्नात कसलीही कसर सोडली नाही. शारदानगर येथे लग्न समारंभ पार पडला. त्यानंतर रविवारी आणि सोमवारी रीतीरिवाज तसेच विधीवत देवदर्शनासाठी नवदाम्पत्य नातेवाईकांसह सोमवारी घरी परतले होते. त्यानंतर पूजा झाली आणि त्याच पहाटे सचिनला ह्रदयविकाराचा झटका आला. त्यानंतर नातेवाईकांनी त्वरीत त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.


दोघांचा विवाहासाठी आलेले पाहुणेही अजून घरातच होते. लग्नाचा मंडपही तसाच होता. मात्र संसार सुरु होण्याआधीच नवरी मुलगी विधवा झाली आणि लग्नाच्या मंडपातून नवरदेवाची पाचव्याच दिवशी अंत्ययात्रा निघाली. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. लग्नाला आलेले नातेवाईकांवर नवरदेवाचे अंत्यसंस्कार करण्याची वेळ नियतीने आणली.

 

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग