Buldhana Rapid Hair Loss reason : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील पूर्णा नदी जवळील बोंडगाव, कालव आणि हिंगणा या गावांमध्ये अनेकांना अज्ञात आजाराने ग्रासले आहे. ग्रामस्थांच्या डोक्याला अचानक खाज येऊन तीन दिवसांत केसगळती होऊन टक्कल पडत होतं. या आजाराचा धसका परिसरातील सर्व नागरिकांनी घेतला होता. तसेच या आजाराची चर्चा संपूर्ण राज्यात दोन दिवसांपासून सुरू आहे. दरम्यान, या आजाराबाबत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने सर्वेक्षण केले असून या आजाराचं कारण समोर आलं आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव जवळील बोंडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या कालवड येथे १३ कठोरा येथील ७ नागरिकांना हा आजार झाला होता. तीन दिवसांत नागरिकांच्या डोक्यावरील केस गळून त्यांना पूर्ण टक्कल पडलं होतं. त्यामुळे हा आजार नेमका काय आहे ? या बाबत बुलढाणा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत सर्व्हेक्षण केलं गेलं. या गावात आरोग्य पथक दाखल झाले होते. नागरिकांची विचारपूस करून त्यांची हिस्ट्री घेतली गेली. या आरोग्य सर्वेक्षणात या आजारचं खरं कारण समोर आलं आहे.
आरोग्य विभागाने सादर केलेल्या अहवालानुसार शेगाव तालुक्यातील बोंडगावातील आणि खातखेड येथील पाण्यात नायट्रेट सारखा अत्यंत विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे. तर पाण्याची टीडीएस लेव्हलही भयंकर वाढली आहे. त्यामुळं हे पाणी वापरणं विष ठरतं आहे. खारपाण पट्ट्यातील या गावात पिण्याच्या पाण्याची वेगळी सोय केलेली आहे. मात्र वापरण्याच्या पाण्यात नायट्रेट हा विषारी घटक आढळल्याने आता हे पाणी वापरण्यायोग्य देखील राहिलं नाही. या नायट्रेटमुळे अत्यंत गंभीर आजार जडू शकतात. टीडीएस लेव्हल आणि नायट्रेटची मात्रा ५० पेक्षा जास्त असल्याने नागरिकांना केसगळतीचा आजर जडला आहे. ज्यांना हा आजार झाला आहे. त्यांच्या घरातील बोअरच्या पाण्याचे नमुने घेण्यात आले. त्याचा रिपोर्ट अद्याप येणे बाकी आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने बोंडगावात सर्वेक्षण केले. त्यामध्ये केसगळतीच्या आजाराने ३० जण बाधित असल्याचं पुढं आलं आहे. आरोग्य विभागाने या ठिकाणी उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, बाधित रुग्णांची संख्या वाढली असू शकते असा देखील अंदाज वर्तवण्यात आला आहे. सुरुवातीला या आजाराची लागण झाल्यानंतर डोके खाजवणे, नंतर केसगळती होऊन केस गळती होत होती. तर तिसऱ्या दिवशी चक्क त्यांना टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
संबंधित बातम्या