मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  मंत्र्याला डावलून सचिवाचे ‘तांदूळ वाटप’; संतप्त मंत्र्याने केली अधिकाऱ्याची उचलबांगडी

मंत्र्याला डावलून सचिवाचे ‘तांदूळ वाटप’; संतप्त मंत्र्याने केली अधिकाऱ्याची उचलबांगडी

HT Marathi Desk HT Marathi
Sep 30, 2022 10:53 PM IST

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक हक्क संरक्षण मंत्री रविंद्र चव्हाण यांनी खात्याची सूत्रे हातात घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी सहसचिवाविरोधात कारवाई करण्याचा प्रसंग उदभवला.

Minister for food and civil supply Ravindra Chavan
Minister for food and civil supply Ravindra Chavan

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक हक्क संरक्षण मंत्री रविंद्र चव्हाण यांनी खात्याची सूत्रे हातात घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी सहसचिवाविरोधात कारवाई करण्याचा प्रसंग उदभवला. मंत्र्यांची दिशाभूल करण्याच्या कारणावरून चव्हाण यांनी त्यांच्या खात्याचे सहसचिव सुधीर तुंगार यांची बदली करून त्यांना मूळ विभागात रवानगी करण्याचे आदेश दिले.

प्राप्त माहितीनुसार भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर या धान उत्पादक जिल्ह्यातील धानापासून तयार झालेला तांदूळ राज्यातील इतर जिल्ह्यांना उचल व वाटप करण्यासंदर्भातील आराखडा तयार करुन त्यास शासनाची मान्यता घेण्याचा निर्णय २०२० मध्ये झाला होता. परंतु या प्रकरणामध्ये अन्न व नागरी पुरवठा विभागाने या विषयाबाबतच्या फाईलवर खात्याचे नवनियुक्त मंत्री रविंद्र चव्हाण यांची मान्यता न घेता २० सप्टेंबर २०२२ रोजी पत्र लिहून उचल व वाटप करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या. सहसचिवांनी हा निर्णय घेतल्यानंतर सदर फाईल मंत्री चव्हाण यांच्या अवलोकनार्थ सादर केली होती. या प्रकारामुळे मंत्री चव्हाण संतप्त झाले. परस्पररित्या निर्णय घेतल्याबद्दल चव्हाण यांनी सहसचिव तुंगार यांची रवानगी त्यांच्या मूळ विभागात करण्याचे आदेश दिले. तसेच तुंगार यांची चौकशी करुन कारवाई करण्याचे आदेश आज अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या सचिवांना दिले आहेत.

अन्न व नागरी पुरवठा विभागाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर खात्याचा कारभार स्वच्छ व पारदर्शक असला पाहिजे अशी अपेक्षा मंत्री चव्हाण यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर सहसचिव तुंगार यांची चूक निर्दशनास आल्यानंतर चव्हाण यांनी त्यांची रवानगी तत्काळ मूळ विभागात करण्याचे आदेश दिले आहेत. तुंगार यांनी हेतुपुरस्सरपणे केलेली कृती ही शासन निर्णयाचे उल्लंघन करणारी असून या प्रकरणात सहसचिव तुंगार हे प्रथम दर्शनी जबाबदार असल्याचे निर्दशनास आले असून त्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे लेखी आदेश मंत्री चव्हाण यांनी विभागाच्या सचिवांना दिले आहेत.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या