आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यात ओबीसी व मराठा समाजामध्ये वाद निर्माण झाला असून दोन्ही समाजामध्ये मोठी दरी निर्माण होऊन टोकाच्या संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या विरोधात पुण्यातील मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके मद्यप्राशन करताना आढळले असल्याचा आरोप मराठा कार्यकर्त्यांनी केला आहे. याचा व्हिडिओही समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. पुण्यातील कोंढवा भागात लक्ष्मण हाके मद्यप्राशन करीत असल्याचा आरोप मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. पुण्यात मराठा कार्यकर्ते व ओबीसी नेता आमने-सामने आले आहेत.
दारुच्या नशेत हाके यांनी शिवागाळ केल्याचा आरोप मराठा कार्यकर्त्यांनी केला आहे. यावेळी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी लक्ष्मण हाके यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कोंढवा पोलीस घटनास्थळी पोहोचले असून परिसरात तणावाची परिस्थिती असल्याचे पाहायला मिळत आहे. जालना जिल्ह्यातील वडी गोदडी गावातही ओबीसी व मराठा समाज आपापसात भिडल्याचे समोर आले आहे.
लक्ष्मण सोपान हाके असे त्यांचे संपुर्ण नाव आहे. सर्वसामान्य धनगर कुटुंबात जन्मलेला मुलगा ते ओबीसी नेता असा लक्ष्मण हाके यांचा प्रवास आहे. सोलापूर जिल्ह्यात एका मेंढपाळ घरात त्यांचा जन्म झाला. सांगली आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर जुजारपूर हे हाके यांचे गाव आहे. त्यांचे वडील सोपान हाके आजही मेंढपाळ म्हणून काम करतात. लक्ष्मण हाके यांनी मेंढीपालन करत करत शिक्षण पूर्ण केले. सांगोला, सांगली पुणे असा त्यांनी शिक्षणासाठी प्रवास केला. पुढे पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात शिक्षण घेऊन प्राध्यापक म्हणून रुजू झाले. दरम्यान ते धनगर आणि ओबीसी चळवळीत ओढले गेले. त्यांनी चांगल्या पगारीची नोकरी सोडली व समाजकार्यात पडले. त्यानंतर ते पुर्णवेळ कार्यकर्ता म्हणून ते काम करू लागले.