Jitendra Awhad Vs Devendra Fadnavis : प्रभू रामचंद्रांच्या आहाराविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यावरून शाब्दिक चकमकी सुरूच आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावरून जितेंद्र आव्हाड यांच्यावर शेलक्या शब्दांत टीका केल्यानंतर आव्हाड यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे. ‘बहुजन समाज शेण खातो असं फडणवीसांचं म्हणणं आहे का,' असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.
प्रभू रामचंद्र हे मांसाहारी होते, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी पक्षाच्या शिबिरात केलं होतं. त्यावरून प्रचंड गदारोळ उठला होता. आव्हाड यांनी जनभावनेची दखल घेऊन वक्तव्याबद्दल खेद व्यक्त केला होता. मात्र, त्यांनी वाल्मिकी रामायणात तसा उल्लेख असल्याचे पुरावेही दिले होते. मी स्वत:च्या मनाचं काहीच बोललेलो नाही. अनेक ठिकाणी हे लिहिलंय. गीतरामायणाच्या माध्यमातून हे वर्षानुवर्षे गायलं जातंय, याची आठवणही आव्हाड यांनी करून दिली होती. मात्र, भाजपनं त्यांच्यावर टीका सुरू ठेवली.
देवेंद्र फडणवीस यांनीही एका कार्यक्रमात बोलताना आव्हाड यांचा उल्लेख न करता त्यांच्यावर टीका केली होती. राम काय खात होते याची उठाठेव काही लोक करत आहेत. राम काय खात होते ते बाजूला ठेवा, पण तुम्ही नक्कीच शेण खाता हे आम्हाला कळलंय. अशा शेण खाणाऱ्यांना बाजूला ठेवा, असं फडणवीस म्हणाले होते.
फडणवीसांच्या या वक्तव्याचा आव्हाड यांनी समाचार घेतला आहे. त्यांनी एक्स अकाऊंटवर सविस्तर पोस्ट केली आहे. 'मी मटण खातो; मटण खातो, म्हणजेच मांसाहार करतो, हे मी माझ्या भाषणात स्पष्टपणे म्हटलं आहे. महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरातील सुमारे ७७ टक्के लोक मांसाहारी आहेत. मग, मांसाहार करणारा प्रत्येक माणूस शेण खातो, असं फडणवीसांचं म्हणणं आहे का? तसं असेल तर देशातील ७७ टक्के लोक शेण खातात, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच, बहुजन समाज शेण खातो, असं फडणवीसांचं म्हणणं असेल तर आश्चर्यच आहे, असं आव्हाड यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
‘मांसाहार करणारे हे जरा खालचेच असतात. असं काहीतरी नवीन हल्ली सुरू झालं आहे. शाकाहार … उच्च, मांसाहार …. नीच’ अशी टिप्पणीही आव्हाड यांनी शेवटी केली आहे. त्यांच्या या पोस्टवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.