Chhatrapati Shivaji Maharaj Statue : मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५ फुटी भव्य पुतळा कोसळला. हा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. यावरून राजकीय वातावरणही तापलं असून ठाकरे व राणे समर्थकांमध्ये राजकोट परिसरात तुफान राडा झाला. त्यातच आता राज्याच्या कला संचालनालयाच्या संचालकांनी एक गौप्यस्फोट केल्याने खळबळ माजली आहे. कला संचालक राजीव मिश्रा यांनी सांगितले की, मालवणमध्ये ३५ फुटी पुतळा उभारणार असल्याचे आम्हाला सांगितलेच नव्हते. संचालनालयाने केवळ ६ फुटांच्या पुतळ्यास परवानगी दिली होती.
शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उंचीबद्दल अधिकाऱ्यांनी वेगळीच माहिती दिल्याने खळबळ उडाली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना कला संचालनालयाचे संचालक राजीव मिश्रा यांनी म्हटले की, मालवणमधील ३५ फुटांच्या पुतळ्याला परवानगी दिली गेलीच नव्हती. तेथे ६ फुटांच्या पुतळ्यालाच परवानगी दिली गेली होती.
मिश्रा यांनी पुढं सांगितलं की, पुतळा उभारण्याच्या प्रकरणात क्ले मॉडेलला मान्यता घेतली होती. राज्याच्या कला संचालनालयाने नौदलाला ही मान्यता देण्यात आली. जेव्हा ही मान्यता दिली गेली, तेव्हा आम्हाला हे सांगितले नव्हते की, हा पुतळा ३५ फुटाचा असणार आहे आणि या पुतळ्यासाठी स्टेनलेस स्टील वापरले जाणार आहे.
आमच्याकडे केवळ ६ फुटांचा पुतळा उभारण्याची परवानगी मागितली होती. पुतळा उभारताना आम्हाला माहिती दिली नाही, त्यामुळे आम्हाला विचारता आले नाही. त्यांना विचारता येत नाही, तशी तरतूद नाही. या पुतळ्याबद्दल आम्हाला काहीही माहिती नव्हती. त्यामुळे आम्हाला काही करता आले नाही. पुतळा उभारताना त्यांनी त्यांच्या स्तरावर निर्णय घेतले, आम्हाला त्याबाबत कळवले नाही, असं राजीव मिश्रा यांनी सांगितले.
आता पुतळा कोसळल्याची जबाबदारी कोणाची या प्रश्नावर राजीव मिश्रा म्हणाले की, जेव्हा शिल्पकाराकडे पुतळा उभारण्याचे काम दिले तेव्हा ज्या एजन्सीने त्यांना उंची आणि मटेरियल ठरवण्याचा निर्णय दिला. त्या एजन्सीला सांगायला हवे होते की, ३५ फुटांचा पुतळा उभारण्यासाठी मला तांत्रिक मदत लागेल. तांत्रिक मदत म्हणजे स्ट्रक्चरल इंजिनिअरींग, अशी भूमिका मिश्रा यांनी सांगितले.