मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  नवी मुंबईत विना परवानाधारक परप्रांतीय मासे विक्रेत्यांवर कारवाई होणार?

नवी मुंबईत विना परवानाधारक परप्रांतीय मासे विक्रेत्यांवर कारवाई होणार?

HT Marathi Desk HT Marathi
Aug 23, 2022 06:16 PM IST

परप्रांतातून येऊन महाराष्ट्रात विविध शहरांत काही विना परवानाधारक व्यक्ती मासे विक्रीचा व्यवसाय करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.

परप्रांतीय मासेविक्रेत्यांमुळे नवी मुंबईत स्थानिक मासे विक्रेत्यांवर परिणाम होत असल्याची तक्रार
परप्रांतीय मासेविक्रेत्यांमुळे नवी मुंबईत स्थानिक मासे विक्रेत्यांवर परिणाम होत असल्याची तक्रार

परप्रांतातून येऊन महाराष्ट्रात विविध शहरांत काही विना परवानाधारक व्यक्ती मासे विक्रीचा व्यवसाय करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. या अनुषंगाने राज्य शासनाकडून विधानपरिषदेतील आमदारांची समिती गठीत करण्यात येणार आहे. आमदारांची ही समिती सरकारला शिफारशी सादर करणार असल्याची माहिती राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानपरिषदेत एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले.

नवी मुंबईतील परप्रांतीयाकडून विनापरवाना मासे विक्री करण्यात येत असल्याबाबत विधानपरिषदेतील भाजप आमदार विजय गिरकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना मंत्री मुनगंटीवार बोलत होते.

मासेमारीसाठी स्थानिक महानगरपालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांकडून परवाने दिले जातात. विना परवाना मासे विक्री होत असल्यास मत्स्यव्यवसाय विभागाकडून महानगरपालिका आयुक्तांना या अनुषंगाने योग्य ती कार्यवाही आणि कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात येतील. या संदर्भातील नियम अवलोकन करण्यासाठी विधानपरिषद सदस्यांची समिती तयार करण्यात येईल, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.

या प्रश्‍नाच्या वेळी विधानपरिषदेतील कॉंग्रेसचे आमदार भाई जगताप, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे तसेच शेकापचे जयंत पाटील यांनी सहभाग घेतला होता.

राज्यात विविध महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रांत प्रशासनाकडून फेरीवाला सर्व्हेक्षण केले जाते. त्यानुसार मासेविक्रेत्यांना परवाना जारी करण्यात येत असतो.

मुंबई, नवी मुंबई, ठाणे, वसई, मालाड आणि कल्याणमध्ये मासळीची मोठी बाजारपेठ आहे. या ठिकाणी महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात, गोवा या राज्यातून मासळी मुंबई बाजारात विकण्यास येते. काही ठिकाणी महिला संघांना मासे विक्रीचा परवाना देण्यात आला आहे. एकट्या नवी मुंबईत मासे विक्रीचे २६ मार्केट आहेत. जवळपास ७५० महिला मासेविक्रीचा व्यवसाय करतात. परंतु येथील स्थानिक महिला मासेविक्रेत्यांना अद्याप परवाने मिळालेले नाहीत. मच्छीविक्रीचा परवाना असल्यास विक्रेत्यांना राज्य तसेच केंद्र सरकारच्या असलेल्या योजनांचा लाभ घेता येते.

WhatsApp channel

संबंधित बातम्या