sound pollution in Pune ganesh Visarjan mirvnuk : पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत आवाजाच्या मर्यादा पळण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या होत्या. मात्र, या सूचनांकडे गणेश मंडळांनी साफ दुर्लक्ष केल्याचं अहवलावरून दिसत आहे. गणेश विसर्जन मिरवणूकदरम्यान गेली सलग दोन वर्षे १०० डेसिबलपेक्षा अधिक नोंदविली जाणारी आवाजाची पातळी यंदा मात्र तुलनेने कमी नोंदविली गेली असली तरी ध्वनि प्रदूषणाने मर्यादा ओलांडली असल्याचं सीओइपी तंत्रज्ञान विद्यापीठाने केलेल्या अहवालात पुढं आलं आहे.
पुणे तर्फे गणेश विसर्जना दरम्यान घेण्यात आलेल्या नोंदीच्या अहवालानुसार ही माहिती पुढे आली आहे. यावर्षी लक्ष्मी रस्त्यावरील सार्वजनिक गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत एकंदर आवाज सरासरी ९४.८ डेसिबल इतका नोंदविण्यात आला आहे. ही पातळी गेल्या दोन वर्षांमधील ध्वनीच्या पातळीपेक्षा कमी असली तरी, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक आहे, त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदा देखील उत्सवादरम्यान ध्वनी प्रदूषणाची परंपरा कायम राहिली आहे.
सीओईपी'च्या आकडेवारीनुसार १७ सप्टेंबर रोजी लक्ष्मी रस्त्यावरील १० चौकांमध्ये दिवसा ध्वनीची पातळी ही ८९.४ ते ९२.६ डेसिबल दरम्यान नोंदविण्यात आली. मात्र १७ सप्टेंबर'च्या रात्री तसेच १८ सप्टेंबर पहाटेपासूनच आवाजाची मर्यादा मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे दिसून आले, तसेच दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच सर्वच चौकांमध्ये १०० डेसिबलपेक्षा अधिक आवाजाची नोंद घेण्यात आली. यामध्ये बेलबाग चौक, होळकर चौक आणि खंडोजी बाबा चौक येथे मोठया प्रमाणात ध्वनी प्रदूषणाची नोंद झाली
सी ओ ई पी महाविद्यालयाच्या अप्लाइड सायन्सेस अँड ह्युमनिटीज विभागातर्फे शैक्षणिक संशोधन प्रकल्पाचा भाग म्हणून गेली १९ वर्षे गणेश विसर्जन मिरवणूक काळात लक्ष्मी रस्ता येथील १० चौकांमध्ये ध्वनीची पातळी मोजली जाते. यंदा देखील विभाग प्रमुख महेश शिंदिकर यांच्या नेतृत्वाखाली, महाविद्यालयातील २० विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता. या उपक्रमाचे नियोजन इरा कुलकर्णी आणि मेहेर रेघटाते यांनी केले होते.
याबाबत बोलताना विभागप्रमुख महेश शिंदीकर म्हणाले," या उपक्रमांतर्गत विसर्जन मिरणुकीदरम्यान रस्त्यावरील २४ तासातील आणि १० चौकातील आवाजाच्या पातळीचा आढावा घेतला जातो. ही सर्व निरीक्षणे केवळ अभ्यास, जनजागृती आणि संशोधन यासाठीच वापरण्यात येतात. कोणत्याही स्रोताच्या संदर्भात या नोंदी घेत नसून या मिरवणुकीच्या दरम्यान चौकात उभ्या असलेल्या सामान्य माणसाच्या कानावर पडणारा आवाज याद्वारे नोंदविला जातो. यंदा उत्सवाच्या तयारी दरम्यान वादन पथकांच्या सरावामुळे चिंतीत झालेल्या पुणेकराना प्रत्यक्ष गणेशोत्सव काळात मंडळांच्या अवतीभोवती नेहमीपेक्षा अधिक गर्दी असूनही आवाजाची पातळी निश्चित कमी आढळली होती."