Mumbai Water Cut : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे उदंचन केंद्राला सोमवारी आग लागल्यामुळे याचा परिमाण मुंबईच्या पाणी पुरवठ्यावर होणार आहे. मुंबई महानगर पालिकेने मध्यरात्रीपासून पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला असून पुढील सूचना मिळेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. यामुळे काही भागात १०० टक्के पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने पाण्याचा योग्य वापर करावा, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.
मुंबई महानगर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई पूर्व उपनगरातील पूर्वेचा भाग, ट्रॉम्बे निम्न स्तरीय जलाशय, ट्रॉम्बे उच्च जलाशय, घाटकोपर निम्न स्तरीय जलाशय तसंच शहर विभागातील एफ दक्षिण व एफ उत्तर गोलंजी, फोसबेरी, राओली, भंडारवाडा या जलाशयातून होणारा पाणीपुरवठा मध्यरात्रीपासून पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहणार आहे. तर उर्वरित शहर विभाग, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरांमधील पाणी पुरवठ्यामध्ये ३० टक्के पाणी कपात केली जाणार आहे.
एस विभाग - नाहुर पूर्व, विक्रोळी पूर्व, भांडुप पूर्व - १०० टक्के पाणी कपात
एन विभाग- विक्रोळी पूर्व , घाटकोपर पूर्व , सर्वोदय नगर नारायण नगर- १०० टक्के पाणी कपात
एम पूर्व एम पश्चिम विभाग - १०० टक्के पाणी कपात
एफ दक्षिण एफ उत्तर - १०० टक्के पाणी कपात
भंडारवाडा जलाशयातून होणारा ई विभाग बी विभाग ए विभाग -१०० टक्के पाणी कपात
पश्चिम उपनगर , पूर्व उपनगर उर्वरित महानगर पालिकेच्या शहरी भाग- ३० टक्के पाणी कपात