wagh nakh : महायुती सरकार जी वाघनखं आणणार आहे, ती शिवरायांनी वापरल्याचा कुठलाही पुरावा नाही; लंडनमधून आलं पत्र
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  wagh nakh : महायुती सरकार जी वाघनखं आणणार आहे, ती शिवरायांनी वापरल्याचा कुठलाही पुरावा नाही; लंडनमधून आलं पत्र

wagh nakh : महायुती सरकार जी वाघनखं आणणार आहे, ती शिवरायांनी वापरल्याचा कुठलाही पुरावा नाही; लंडनमधून आलं पत्र

Updated Jul 08, 2024 06:30 PM IST

Jitendra Awhad on Wagh Nakh : महायुती सरकार लंडनच्या म्युझियममधून आणत असलेल्या वघनखांचा छत्रपती शिवाजी महाराजांशी काहीही संबंध नाही, अशी माहिती पुढं आली आहे.

महायुती सरकार जी वाघनखं आणणार आहे, ती शिवरायांनी वापरल्याचा कुठलाही पुरावा नाही; लंडनमधून आलं पत्र
महायुती सरकार जी वाघनखं आणणार आहे, ती शिवरायांनी वापरल्याचा कुठलाही पुरावा नाही; लंडनमधून आलं पत्र

Jitendra Awhad on wagh nakh : 'इंग्लंडमधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये असलेली वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरल्याचा कुठलाही ऐतिहासिक पुरावा नाही आणि त्यांनी तसं कधी म्हटलेलंही नाही,' असा दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. म्युझियमनं तसं पत्रच पाठवल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

लंडनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखं असून ती भारतात परत आणण्याची घोषणा महायुती सरकारनं केली आहे. सरकारनं ही घोषणा केल्यापासून त्या विषयी उलटसुलट चर्चा सुरू आहे. जितेंद्र आव्हाड यांनी यापूर्वीच या सगळ्याच्या सत्यतेविषयी शंका उपस्थित केली होती. आज त्यांनी एका पत्राच्या आधारे राज्य सरकारला घेरलं आहे.

इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना लंडनहून पत्र

जिथून ही वाघनखं आणणार असल्याचं सरकार सांगत आहे, त्याच म्युझियमचं हे पत्र आहे. हे पत्र त्यांनी ज्येष्ठ इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना लिहिलं आहे. त्या पत्रानुसार, संबंधित म्युझियमनेच तसा कोणताही पुरावा आमच्याकडं नसल्याचं म्हटलं आहे. या पत्रामुळं महायुती सरकारची गोची होण्याची शक्यता आहे. सरकार आता यावर काय प्रतिवाद करणार हे पाहावं लागणार आहे.

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

'अफझलखानाचं पोट फाडताना छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखं आम्ही आणणार, इंग्लंडमधील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममध्ये ही वाघनखे आहेत, असा दावा महायुती सरकारनं केला होता. त्याचवेळेस आम्ही सांगितलं होतं की, त्या वाघनखांची खरी माहिती कोणालाच नाही. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली हीच वाघनखं आहेत, असं म्हणता येणार नाही. पण, भावनिक राजकारण करून लोकांना आपल्याकडे वळविण्याची सवय असल्यानं सरकारनं ती वाघनखं आणण्याची घोषणाच करून टाकली. त्यावर करोडो रुपये खर्च केले. बातम्या छापून आणल्या. आता व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमच्या व्यवस्थापनानं पत्र लिहून, ज्येष्ठ इतिहास संशोधक तथा इतिहासकार इंद्रजित सावंत यांना यातील वस्तुस्थिती कळवली आहे. शिवरायांच्या नावानं भावनिक राजकारण करायचं हे काही लोकांच्या मनातच असतं. पण हे भावनिक राजकारण करता करता छत्रपती शिवाजी महाराजांच्या शस्रास्रांविषयी खोटी माहिती महाराष्ट्रातील तमाम श्रद्धाळू लोकांपर्यंत पोहचवित आहेत. कमीत कमी छत्रपती शिवाजी महाराजांशी तरी राजकारण करू नका, असं आवाहन जितेंद्र आव्हाड यांनी एका व्हिडिओ पोस्टच्या माध्यमातून केलं आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर