आणीबाणीत संविधानाची हत्या झाली नव्हती, यापुढंही कुणी करू शकणार नाही; माजी न्या. सत्यरंजन धर्माधिकारी यांचं परखड मत
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  आणीबाणीत संविधानाची हत्या झाली नव्हती, यापुढंही कुणी करू शकणार नाही; माजी न्या. सत्यरंजन धर्माधिकारी यांचं परखड मत

आणीबाणीत संविधानाची हत्या झाली नव्हती, यापुढंही कुणी करू शकणार नाही; माजी न्या. सत्यरंजन धर्माधिकारी यांचं परखड मत

Updated Jul 19, 2024 10:53 PM IST

Dinu Randive Smruti Puraskar : ‘संविधानाची हत्या आणीबाणीमध्येही झाली नव्हती आणि यापुढंही कुणी संविधानाची हत्या करू शकत नाही. ते शक्यच नाही,’ असं परखड मत मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांनी व्यक्त केलं.

आणीबाणीत संविधानाची हत्या झाली नव्हती, यापुढंही कुणी करू शकणार नाही; माजी न्या. सत्यरंजन धर्माधिकारी यांचं परखड मत
आणीबाणीत संविधानाची हत्या झाली नव्हती, यापुढंही कुणी करू शकणार नाही; माजी न्या. सत्यरंजन धर्माधिकारी यांचं परखड मत

Dinu Randive Smruti Puraskar : ‘संविधानाची हत्या आणीबाणीमध्येही झाली नव्हती आणि यापुढंही कुणी करू शकत नाही. ते शक्य नाही,’ असं परखड मत मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांनी व्यक्त केलं.

धर्माधिकारी यांच्या हस्ते आज ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे यांना यंदाचा पत्रकार दिनू रणदिवे स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबई मराठी पत्रकार संघात हा सोहळा झाला. यावेळी धर्माधिकारी यांनी सध्याच्या सामाजिक व राजकीय स्थितीचा आढावा घेतला व पत्रकारांकडून काही अपेक्षा व्यक्त केल्या.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात संविधानाचा मुद्दा प्रचंड गाजला होता. भाजप पुन्हा सत्तेवर आल्यास देशाचं संविधान संपवलं जाईल, असा प्रचार विरोधक करत होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून एनडीएच्या नव्या सरकारनं आणीबाणी लागू झाल्याचा दिवस संविधान हत्या दिवस म्हणून घोषित केला आहे.

या सगळ्या कुरघोडीच्या राजकारणाच्या अनुषंगानं बोलताना धर्माधिकारी यांनी संविधानातील मूल्यांवर विश्वास व्यक्त केला. ‘मुळात आणीबाणीत संविधानाची हत्या झाली नव्हती. त्यावेळच्या सरकारनं व मंत्रिमंडळानं संविधानातील काही तरतुदींचा वापर करून आणीबाणी लागू केली होती. आता जी काही हत्या केली असा प्रचार होतोय तो चुकीचा आहे. असं कधी होऊ शकणार नाही. वाटलं तरी संविधान बदलता येणार नाही. प्रास्ताविकेत जी मूल्ये आहेत त्यात बदल करता येणार नाही,' असं धर्माधिकारी म्हणाले.

'प्रचाराचा भाग म्हणून हे सगळं बोलणं ठीक आहे. तीन महिने ते ऐकून वीट आला होता. अमूक एक माणूस संविधान बुडवायला निघालाय. आम्ही ते वाचवणार आहोत असंही काही लोक म्हणत होते. पण मुळात त्यांची गरजच नाही. आमचे नागरिक संविधान वाचवायला समर्थ आहेत. आमचे पत्रकार त्यांना सजग आणि जागरूक ठेवतील. झोपू देणार नाहीत, असा विश्वास धर्माधिकारी यांनी यावेळी व्यक्त केला.

पत्रकार सेक्युलर आहेत का? - मधु कांबळे

पत्रकार मधु कांबळे यांनी सत्काराला उत्तर देताना छोटेखानी भाषण केलं. दिनू रणदिवे यांच्या निष्पक्ष पत्रकारितेचे काही दाखले त्यांनी दिले. रिडल्स आंदोलनाच्या काळात हुतात्मा चौकात झालेल्या गोंधळाचा वृत्तांत दिनू रणदिवे यांनी किती निष्पक्षपातीपणे दिला होता याची आठवण त्यांनी सांगितली. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे असं मानलं जात, तसं असेल तर पत्रकार सेक्युलर असला पाहिजे. तो तसा आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. रिडल्स आंदोलनाच्या काळात दोन्ही बाजूंच्या लोकांना एकत्र आणून पत्रकार संघानं चर्चा घडवून आणली होती. आताही महाराष्ट्रात अनेक वादाचे प्रश्न आहेत. मराठा-ओबीसी आरक्षणाचा संघर्ष सुरू आहे. अशावेळी पत्रकार म्हणून आपण संवाद घडवून आणला पाहिजे. पत्रकार संघानं त्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी मधु कांबळे यांच्या पत्रकारितेचं कौतुक केलं. तसंच, दिनू रणदिवे यांच्याही काही आठवणी सांगितल्या. यावेळी पुरस्कार समितीचे सदस्य व प्रेस क्लबचे माजी अध्यक्ष गुरबीर सिंग, हिंदुस्तान टाइम्स मराठीचे संपादक हारीस शेख, प्रकाश महाडिक व मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण आदी उपस्थित होते.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर