Jayant Patil on Devendra Fadnavis : बदलापुरातील लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर आज पुण्यात पोलिसांवरच हल्ला झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळं राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरलेल्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. मात्र, त्यांच्याच पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी वेगळं मत मांडलं आहे.
पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते. 'आता निवडणुकीसाठी दोन महिनेच राहिले आहेत. दोन महिन्यांसाठी फडणवीसांचा राजीनामा मागण्यात काही अर्थ आहे असं मला वाटत नाही, असं मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं आहे. राज्यातील सध्याच्या परिस्थितीला केवळ एकच व्यक्ती जबाबदार आहे, असं नाही. संपूर्ण सरकारच फेल गेलं आहे, असं जयंत पाटील म्हणाले.
'मुख्यमंत्र्यांपासून सगळं सरकार फेल गेलेलं आहे. महिलांना सुरक्षा ते देऊ शकत नाहीत. बालकांचं संरक्षण करू शकत नाही. आता पोलिसांच्या सुरक्षेचाही प्रश्न समोर आला आहे. हे सरकार राजकारणात इतकं गुंतलेलं आहे की त्यांना कुठेच लक्ष द्यायला वेळ नाही. पोलिसांवरही हल्ले होऊ लागले आहेत. पोलिसांऐवजी गुन्हेगार प्रबळ झाले आहेत. राज्यातील पोलिसांचं मनोधैर्य संपवण्याचं काम सरकारनं केलं आहे. कुणाची कधी बदली होईल, कोणत्या कारणासाठी होईल सांगता येत नाही. सगळ्याच बदल्या आर्थिक व्यवहार करून होत असतील तर नैतिकता काय राहणार, असा प्रश्न जयंत पाटील यांनी केला.
'अजित पवार यांचं पुण्यावर किती लक्ष आहे मला माहीत नाही. पण पोलिसांवर गुन्हेगार हल्ले करायला लागले आहेत हे समोर दिसतंय. पोलीस दुबळे झालेत का याचं चिंतन होण्याची गरज आहे. पोलिसांच्या हव्या तशा बदल्या करणं. त्यांच्या कारभारात हस्तक्षेप करणं, पोलिसांना वरून फोन करणं. त्यांच्या सुरक्षेपेक्षा त्यांच्या बदल्यात जास्त लक्ष घालणारं हे सरकार आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी केला.
जयंत पाटील यांच्या इस्लामपूर मतदारसंघात महायुतीनं मोर्चेबांधणी सुरू केली आहे. जयंत पाटील यांना आव्हान देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबत पत्रकारांनी विचारलं असता जयंत पाटील यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं. 'मी एक छोटा कार्यकर्ता आहे. माझं काहीही म्हणणं नाही. या देशात काहीही होऊ शकतं. माझे मतदार हेच माझे समर्थक आहे. त्यांच्यावर विसंबून माझं चाललंय. तुमचाही आशीर्वाद असावा, असा टोला पाटील यांनी पत्रकारांना हाणला.